नवी दिल्ली – तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी हे जरी हाय प्रोफाइल कैदी असले, तरी त्यांना शिक्षा भोगत असताना थेट मजूरी करावी लागणार आहे,
इम्रान खान आणि कुरेशी या दोन्ही नेत्यांना सायफर गैरव्यवहार प्रकरणी विशेष न्यायालयाने दोषी ठरवले असून त्यांना प्रत्येकी १० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात ७१ वर्षीय इम्रान खान आणि ६७ वर्षीय शाह मेहमूद कुरेशी या या दोघांनाही हाय प्रोफाइल कैद्यांच्या कोठडीमध्ये स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहे.
इम्रान खान हे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत तर कुरेशी हे पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. दोघांनाही तुरुंगातील कच्च्या कैद्यांपेक्षा अधिक चांगल्या सुविधा पुरवल्या जात आहेत. या सुविधा त्यांना दोषी ठरवले जाण्यापूर्वी पुरवण्यात येणार् या सुविधांपेक्षा नक्कीच अधिक चांगल्या आहेत. त्यांना व्यायामशाळाची सुविधाही मिळते आहे. आता दोघांनाही तुरुंगातील कैद्यांचा गणवेश देखील देण्यात आला आहे. मात्र इम्रान खान यांच्याविरोधातील अन्य प्रकरणांची सुनावणी अजूनही सुरू असल्यामुळे त्यांना हा गणवेश घालण्याची सक्ती केली जात नाही आहे.
मात्र दोघांनाही तुरुंगातील अन्य कैद्यांप्रमाणे मजूरी करावी लागते आहे. तुरुंगाच्या मॅन्युएलनुसार हायप्रोफाइल कैद्यांना तुरुंगातील फॅक्टरी, स्वयंपाकघर, रुग्णालय, उद्यानामध्ये काम करावे लागत नाही. त्यामुळे त्यांना देखभालीचे किंवा अन्य काम करण्यास देण्यात येते आहे. त्यांना काय काम करायला द्यायचे याचा निर्णय तुरुंगाच्या प्रशासनाकडून घेण्यात येतो आहे, असे माध्यमांनी म्हटले आहे.