पुणे – आयटीआयमध्ये अद्यापही काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही, त्यांच्यासाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे. आयटीआय प्रवेशासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नव्याने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे आणि प्रवेश अर्ज शुल्क भरण्याच्या सुविधेला मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांना 15 नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.
नव्याने अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना 17 नोव्हेंबरपासून अधिकृत संकेतस्थळावरील “नोटिफिकेशन’मध्ये दिलेल्या प्रवेश वेळापत्रकाप्रमाणे संबंधित संस्थेत संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी उपस्थित राहावे लागणार असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आले आहे.