पुणे – केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार महापालिका आगामी तीन महिन्यांत “मिशन इंद्रधनुष्य’ मोहीम राबवणार आहे. यामध्ये मुख्यत: लसीकरणापासून वंचित राहिलेल्या शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना आणि गरोदर मातांना तसेच ज्या बालकांचे लसीकरण वयोमानानुसार आवश्यक आहे अशा सगळ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
पहिली फेरी 7 ते 12 ऑगस्ट, दुसरी फेरी 11 ते 16 सप्टेंबर आणि तिसरी फेरी नऊ ते 14 ऑक्टोबर अशी असणार आहे. “गोवर-रुबेला निर्मूलन’ या केंद्र शासनाच्या मुख्य धोरणाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण करण्यावर या मोहिमेत भर दिला जाणार आहे. या मोहिमेत पहिल्यांदाच दोन ते पाच वर्षे हा वयोगट समाविष्ट करण्यात आला आहे. दि. 6 ऑगस्ट 2018 अथवा त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांचे लसीकरण या मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे. या मोहिमेचे पूर्ण नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले आहे.
“आपले घर अथवा शेजारील सर्व बालकांचे आणि गर्भवतींचे पूर्ण लसीकरण करून घ्यावे. मोहिमेत नव्याने बालकांचे लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल बनवण्यात आले आहे. याद्वारे लसीकरण सत्रांचे दिनांक, वेळ, ठिकाणे याची सर्व माहिती तसेच ऑनलाइन रजिस्ट्रेशन नागरिकांना घरबसल्या करता येणार आहे. लसीकरणासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिक, धर्मगुरू, सामाजिक संस्थांनी जनजागृती करावी.” – रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, मनपा
या भागांत विशेष सत्र
- गोवर रुग्णांचे प्रमाण अधिक असलेले भाग
- लसीकरणास नकार देणारा समाज
- झोपडपट्टी बांधकाम ठिकाणे
- विटभट्ट्या आदी ठिकाणी लसीकरण