पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरामध्ये गणेश विसर्जन करण्यासाठी 50 घाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये फिरते कृत्रिम हौदांचा देखील समावेश आहे. शहरातील प्रमुख दहा गणेश विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली आहे. तसेच या घाटांसह इतर घाटांवर जीवरक्षक, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा पथक नेमण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवासाठी विविध सेवा सुविधा पुरवण्यात येत आहेत. निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव, वाल्हेकरवाडी मधील जाधव घाट, काळेवाडी मधील स्मशान घाट, पिंपळे गुरव घाट, वाकड गावठाण घाट, मोशी नदी घाट, चिखली स्मशान घाट, थेरगाव पूल नदी घाट, सुभाषनगर पिंपरी घाट आणि सांगवी येथील वेताळबाबा मंदिर घाट याठिकाणी वैद्यकीय साहित्य, औषधे आणि सुसज्ज रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक तैनात ठेवले जाणार आहे. या वैद्यकीय पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ब्रदर, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका वाहनचालक सफाई कामगार आदींचा समावेश आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच दि. 4 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक कार्यरत राहणार आहे.
गणेश विसर्जन घाटांवर विसर्जन हौद उभारण्यात आले असून स्वयंसेवी संस्थांमार्फत मूर्ती संकलन देखील केले जात आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांना महापालिकेच्या वतीने आवाहन केले जात आहे. अग्निशमन विभागाच्या वतीने शहरातील 26 विसर्जन घाटांवर लाईफ जॉकेट, रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशमन पथक तैनात करण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयांमार्फत देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांची नियुक्ती, 65 निर्माल्य कुंड
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने घाटांवर निर्माल्यासाठी 65 कुंड ठेवण्यात आले आहेत. तसेच हे निर्माल्य स्वीकारण्यासाठी दोन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयानुसार 50 ते 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्फत गणेश भक्तांकडून येणारे निर्माल्य स्वीकारले जात आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी दिली.