चेन्नई -लियाम लिव्हिंगस्टोनच्या तडाख्यानंतर सिकंदर रझाने केलेल्या अफलातून फलंदाजीमुळे पंजाब किंग्जने रविवारी आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रझाने 3 धावा धावून पूर्ण केल्या व हातातून निसटलेला सामना पंजाबला जिंकून दिला.
चेन्नईने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड व डेव्हन कॉनवे यांनी 86 धावांची सलामी दिली. गायकवाड चांगला खेळत असताना 31 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह 37 धावा करून परतला. त्यावेळी कॉनवेने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला सुरेख साथ देत शिवम दुबेने 17 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांसह 28 धावांची खेळी केली. या जोडीने संघाचे शतक फलकावर लावले. त्यानंतर मोईन अलीने कॉनवेच्या साथीत संघाला दीडशतकी मजल मारून दिली.
कॉनवे थाटात खेळत असताना त्याला स्ट्राईक मिळाली नाही व त्याचे शतक हुकले. त्याने आपल्या नाबाद 92 धावांच्या आक्रमक खेळीत 52 चेंडूत 16 चौकार व 1 षटकार फटकावला. तशात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 2 षटकार फटकावताना नाबाद 13 धावा करत संघाला द्विशतकी पल्ला गाठून दिला. जडेजानेही उपयुक्त 12 धावांची खेळी केली.
विजयासाठी 201 धावांचा पाठलाग करताना पंजाबला कर्णधार शिखर धवन व प्रभसिमरन सिंग यांनी अर्धशतकी सलामी दिली. धवन 15 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह 28 धावा काढून बाद झाला. पाठोपाठ प्रभसिमरनही 24 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांसह 42 धावा करून परतला. अथर्व तायडेनेही निराशा केली. यावेळी पंजाबच्या हातातून सामना सुटत चालला होता. त्याचवेळी लियाम लिव्हिंगस्टोनने वादळी फलंदाजी केली.
त्याने अवघ्या 24 चेंडूत 1 चौकार व 4 षटकारांची फटकेबाजी करत 40 धावांची खेळी केली व सामना पंजाबच्या आवाक्यात आला. तो बाद झाल्यावर सॅम कुरेनने 29 तर जीतेश शर्माने 21 धावा करताना संघाचा विजय दृष्टिपथात आणला. मात्र, हे दोघेही बाद झाल्यावर चेन्नई बाजी मारणार असेच चित्र होते. सिकंदर रझाने अखेरच्या षटकात कमालीची फलंदाजी केली. त्यानेच संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने नाबाद 13 धावांची खेळी करताना अखेरच्या चेंडूवर तीन धावा काढत विजय साकार केला.
लक्षवेधी
डेव्हन कॉनवेची
खेळी व्यर्थ
पंजाबचा कुरेन ठरला महागडा गोलंदाज
प्रभसिमरन सिंगची फटकेबाजी
लिव्हिंगस्टोनची
वादळी खेळी
रझाच्या मोलाच्या खेळीने पंजाबला तारले