चिंबळी -करोनामुळे हॉटेल-खानावळ अनेक दिवस बंद होत्या. त्यानंतर केवळ पार्सल सेवा देण्यास परवानगी देण्यात आली होती. तर आता पूर्णपणे सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, केळगाव-चिंबळी रस्त्यावर काही हॉटेल व्यावसायिक अवैध दारू विक्री करीत असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खेडच्या दक्षिण भागात औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे या पक्षरिसरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे केळगाव-चिंबळी रस्त्यावर हॉटेल, खानावळ, चायनीजचे स्टॉल मोठ्या संख्येने उभारण्यात आले आहेत.
मात्र, करोना, लॉकडाऊनमुळे मध्यंतरी ते पूर्णपणे बंद होते. आता पुन्हा सुरू झाले असून ते खुलेआम अवैध दारू विक्री करीत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताचे काम गेले आहेत. यात तरुण वर्ग अधिक असून तो दारूच्या आहारी जावू लागला आहे. त्यामुळे या अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.
आम्ही या संर्दभात चौकशी व पाहणी करून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करून अवैध धंदे बंद करणार आहोत.
-रवींद्र चौधर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, आळंदी.