नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात केलेले संघटनात्मक बदल आता हळूहळू दिसून येत आहेत. राष्ट्रवादीची दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब असल्यामुळे आता वेगवेगळ्या अटकळींना पेव फुटले आहे.
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे व आपले विश्वासू प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली होती. यावेळी त्यांनी सुप्रियांची पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रमुखपदीही नियुक्ती केली होती. त्यांचा हा निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक असल्याचे मानले जात आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीतही पोस्टरवरून अजित पवार यांचा फोटो गायब झाल्याचे दिसून आले. बैठकस्थळी लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवारांसह केवळ सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल या दोघांचेच फोटो आहेत. या गोष्टीची बैठकस्थळी खमंग चर्चा रंगली होती.
गत काही दिवसांत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अनेक फेरबदल झाले. पण त्यात अजित पवारांना कोणतेही स्थान मिळाले नाही. यामुळे शरद पवारांनी अजित पवारांकडे साफ दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर अजितदादांनी अलीकडेच एका कार्यक्रमात आपल्याला पक्ष संघटनेत एखादी जबाबदारी देण्याची मागणी केली. त्यावरही आता पक्ष नेतृत्वाने हुशारीची भूमिका घेतली आहे.