मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केले होते. असे असतानाच काँग्रेसने कोश्यारी यांचा नवा व्हिडीओ अपलोड करून २६/११च्या मुंबई हल्ल्यामधील हुतात्म्यांचा अपमान केल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजी राजे यांनीदेखील भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात चांगलेच संतप्त झाले आहेत.
छत्रपती शिवरायांविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर अद्याप कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सरकारला शिवभक्तांच्या भावना समजत नसतील तर उठाव होणारच, असे म्हणत संभाजीराजे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच या मागणीची दखल घेतली जात नसेल, तर राज्यात उठाव होणार असा इशारा त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिला आहे.
भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !#कोश्यारी_हटाओ
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 27, 2022
‘भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच’, असे संभाजीराजे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवरांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना २६ नोव्हेंबर रोजी अभिवादन केले. या अभिवादनादरम्यानचा व्हिडीओ काँग्रेसने ट्वीट केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी हुताम्यांचा अपमान केला आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे.