ICC ODI World Cup 2023 England vs South Africa Match Result – विश्वचषकाच्या 20व्या सामन्यात शनिवारी(दि.21) दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 229 धावांनी पराभव केला. त्यानंतर आता एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडसमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या साखळी स्पर्धेत चारपैकी तीन सामने त्यांनी गमावले असल्याने स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना पुढील पाचही सामने जिंकावे लागणार आहेत. मात्र, त्यात एका सामन्यात जरी त्यांचा पराभव झाला तरीही त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.
इंग्लंड संघानं आतापर्यंत खेळलेल्या चारपैकी केवळ बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला होता. बाकी सामने त्यांनी गमावले आहेत. त्यात अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि आज दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडचा नेट रनरेट -1.248 वर आला आहे. त्यामुळे गुणतालिकेत त्यांचा संघ नवव्या स्थानावर आहे. स्पर्धेत इंग्लंडचे पुढील दोन सामने कठीण आहेत. 26 तारखेला चेन्नईत श्रीलंकेशी तर 29 तारखेला लखनौमध्ये भारताशी सामना होणार आहे. त्यांच्या प्रमुख फलंदाज तसेच गोलंदाजांचे अपयश स्पष्ट दिसत असल्याने पुढील पाचही सामने जिंकणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण दिसत आहे.
दरम्यान, मुंबई (दि. 21) येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 229 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत इतिहास रचला. हेन्रिक क्लासेनने (109) केलेल्या “क्लास’ शतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने इंग्लंड संघाविरुद्ध विश्वकरंडक स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येची नोंद करताना एकदिवसीय क्रिकेटमधील इंग्लंडचा हा सर्वात मोठा पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना क्लासेनसह रिझा हेंड्रिक्स (85), रॉसी वॅन डर दुसेन (60) व मार्को जानसेन(75) यांनी झंझावाती खेळी करताना दक्षिण आफ्रिकेला 399 धावा उभारून दिल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 170 धावाच करू शकला. गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक तीन बळी घेतले. लुंगी एनगिडी आणि मार्को जानसेन यांना प्रत्येकी दोन फलंदाज बाद करण्यात यश मिळाले. अशाप्रकारे इंग्लंडचा हा विश्वकरंडकातील तिसरा पराभव ठरला. तसेच विश्वकरंडकात लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा हा सर्वात मोठा पराभव आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेनेच 1999 च्या विश्वकरंडकात त्यांना 122 धावांनी पराभूत केले होते.
या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांकडून चांगली कामगिरी झाली नाही. पहिली विकेट लवकर पडल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांचा वेग कायम ठेवला आणि मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरूच ठेवली. यामुळे संघाला 399 धावांपर्यंत मजल मारता आली. वनडे फॉरमॅटमध्ये इंग्लंडविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली ही
सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी 2015 मध्ये न्यूझीलंड संघाने ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध 398 धावा केल्या होत्या.
अखेरच्या 10 षटकांत 143 धावा
इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात शेवटच्या 10 षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची स्फोटक खेळी पाहायला मिळाली. क्लासेनने आपले शतक पूर्ण केले, तर मार्को जानसेनने 42 चेंडूंत 3 चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 75 धावांची खेळी केली. विश्वकरंडकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावण्यात क्लासेन आता सहाव्या क्रमांकावर आहे. या सामन्यात त्याने अवघ्या 61 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या.
धावफलक :-
दक्षिण आफ्रिका : 50 षटकांत 7 बाद 399 (रिझा हेंड्रिक्स 85, रॉसी वॅन डर दुसेन 60, एडन मार्करम 42, हेनरिक क्लासेन 109-67 चेंडू, मार्को जानसेन 75; रिस ट्रोपली 3-88, गुस एटकिंन्सन 2-60, आदिल राशिद 2-61) Vs इंग्लंड : 22 षटकांत सर्वबाद 170 (मार्क वुड 43, गुस एटकिंन्सन 35; जेराल्ड कोएत्झी 3-35, मार्को जानसेन 2-35, लुंगी एनगिडी 2-26, केशव महाराज 1-27).