बेंगळुरू – आपला सतत मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करीत कर्नाटकातील एका आयएएस अधिकाऱ्याने आपल्या नोकरीचाच राजीनामा दिल्याची घटना आज घडली. पी. रवींद्रनाथ असे या अधिकाऱ्याचे नावे आहे.
आपल्याला येथे नीट काम करू दिले जात नसल्याची त्यांची मुख्य तक्रार आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाशी संबंधित लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्यामुळे, त्रास देण्याच्या उद्देशाने माझी मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे कर्नाटक सरकारच्या कार्यपद्धतीवर पुन्हा टीकासत्र सुरू होण्याची शक्यता आहे.
त्यावर प्रतिक्रीया देताना राज्याचे एक मंत्री शिवराम हेब्बर म्हणाले की, असे राजीनामे भाजप सरकारच्या कार्यकाळातच नव्हे, तर प्रत्येक सरकारच्या कार्यकाळात येतात. आपल्याला दबावाखाली काम करावे लागत असल्याच्या तक्रारी हे अधिकारी करतात पण कधीकधी त्यांच्या बाबतीत काही वेगळ्याही अंतर्गत बाबी घडत असतात असे ते म्हणाले.
रविंद्रनाथ यांनी राजीनामा का दिला याची मला नेमकी कल्पना नाही. पण त्यांनी सरकारला दोष दिलेला नाही. काम करणारा हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या दबावाखाली असतो. हेब्बर म्हणाले की मी मंत्री आहे आणि माझ्यावर खूप दबाव आहे पण राजीनामा हा उपाय नाही.