चंदीगड – वादग्रस्त कृषी विधेयकाच्या निषेधार्थ उत्तर भारतात निषेधाची जोरदार लाट उसळली आहे. पंजाब आणि हरियाणात जागोजागी रास्ता रोको करण्यात येत आहे. काही ठिकाणांहून नागरिक दिल्लीच्या दिशेने आंदोलनासाठी निघाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हरीयाणा आणि पंजाबच्या सीमेवर दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
अशातच आता हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी कृषी विधेयकांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. एका नामांकित वृत्तसंस्थेशी बोलताना चौटाला यांनी, संसदेमध्ये पास करण्यात आलेल्या कृषी विधेयकांमुळे एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमतीस कोणताही धोका नसल्याचा दावा केला.
चौटाला म्हणाले, “संसदेमध्ये पास करण्यात आलेल्या कृषी विधेयकांमुळे एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमतीस कोणताही धोका निर्माण होत नाही. ज्या दिवशी या विधेयकांमुळे एमएसपीला कोणताही धोका निर्माण होईल त्याच दिवशी पदाचा राजीनामा देईन.”
तत्पूर्वी, पंजाब आणि हरियाणात गेले काही दिवस सुरू असणाऱ्या निदर्शनाची तीव्रता आज (रविवारी) वाढली. शेजारच्या राज्यात सुरू असणाऱ्या आंदोलनामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
पंजाबात किसान आक्रोश
पंजाबमध्ये युवक कॉंग्रेसने दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर किसान आक्रोश मोर्चा काढला. ट्रॅक्टरची रॅली काढून केलेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विधेयकाच्या प्रतिकात्मक प्रतिमांचे दहन केले.