अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. याचा उत्साह संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. हा सोहळ्यावरून अनेक राजकीय नेते विविध प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र मंत्री तेज प्रताप यादव यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. श्रीरामाने २२ जानेवारी रोजी अयोध्येला येणार नसल्याचे माझ्या स्वप्नात येऊन सांगितल्याचे म्हंटले आहे.
बिहारचे पर्यावरण मंत्री तेजप्रताप यादव म्हणाले की, “श्रीराम माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी मला सांगितलं की, ते येत्या २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ते अयोध्येला येणार नाहीत. श्रीराम मला म्हणाले, सध्या अयोध्येत जे काही चाललंय ते ढोंग आहे. त्यामुळे मी त्या दिवशी तिकडे येणार नाही.” दरम्यान, तेजप्रताप यादव यांनी यापूर्वी देखील अनेकदा स्वप्नांचा उल्लेख करत विविध दावे केले होते.
यापूर्वी तेजप्रताप यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत आधी ते झोपलेले दिसत होते. त्यानंतर ते उठले आणि मी स्वप्नात भगवान श्रीकृष्णाचा रौद्र अवतार पाहिला, असे म्हंटले. याआधी तेज प्रताप सायकलवरुन त्यांच्या कार्यालयात पोहोचले होते.
तेव्हा त्यांनी सांगितले होते की, त्यांना सकाळी झोपेत स्वप्न पडले आणि स्वप्नात मुलायम सिंह स्वप्नात आले. मुलायम सिंह यांनी त्यांच्याशी बराचवेळ चर्चा केली आणि त्यांना मिठीही मारली. आम्ही दोघांनी खुपवेळ सायकल चालवली. यामुळेच मला सायकलवरुन कार्यालयात येण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले होते.