स्वत:ला लालूंचा वारस घोषित करण्याचा प्रयत्न

पाटणा – बिहारचे दिग्गज नेते लालू प्रसाद यादव त्यांच्या तुरूंगवारी आणि नंतर प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणात आता तितके सक्रिय नाहीत. मात्र त्यांच्या दोन्ही मुलांनी खूप पूर्वीच राजकारणात प्रवेश केला असून त्यांनी मंत्रीपदेही भूषवली आहेत.

आता लालूंच्या राष्ट्रीय जनता दलात त्यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यादव यांचाच वरचष्मा असल्याचे बोलले जाते. वस्तुस्थितीही तशीच आहे. मात्र थोरले पुत्र तेजप्रताप यादव यांना कदाचित मान्य नसावे. त्यामुळे त्यांनी आता फेसबुकवर सेकंड लालू तेज प्रताप यादव नावाचे पेज सुरू केले आहे.

तेजप्रताप यादव हे बिहारच्या राजकारणातील एक वेगळेच रसायन आहे. ते कधी तेथील एखाद्या मिठाईच्या दुकानात जीलेबी तयार करताना दिसतात, तर कधी भगवान श्रीकृष्णाच्या वेषभुषेत बासरी वाजवतानाही दिसतात. इतर अनेक लक्षवेधी आणि तितक्‍याच वादग्रस्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत.

लहान भाउ तेजस्वी यांच्या जाहीर टिप्पणी करण्याचा प्रतापही त्यांनी केला आहे. आता तेजस्वीच राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले असताना तेजप्रताप यांनी फेसबुकच्या या पेजद्वारे स्वत:ला सेकंड लालू यादव घोषित करून वेगळ्याच विषयाला तोंड फोडले आहे.

दरम्यान, या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्या समर्थकांशी संवाद साधण्याचा आणि त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याचा धडाकाही तेजप्रताप यांनी लावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळीही ते त्यांच्या वेगवेगळ्या कारनाम्यांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या स्वत:च्या घरातील कलहही त्यावेळी शिगेला पोहोचला होता. मात्र याची त्यांना तमा नसून लालू त्यांच्या उमेदीच्या काळात जशा लक्षवेधी व काहीशा विदूषकी धाटणीच्या वाटणाऱ्या कृती करायचे तसेच तेजप्रताप आता करताना दिसत आहेत.

मात्र गेल्या काही काळात राजकारणाचा पोत बदलला आहे. नागरिकांनी चार पाच दशकांपूर्वी लालूंना ज्या गोष्टींसाठी स्विकारले अथवा त्यांच्या ज्या गोष्टी स्विकारल्या, त्या आता पुन्हा मान्य करतील का, याचे उत्तर बिहारच्या जनतेनेच द्यायचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.