मुंबई – “मला कोणत्याही क्षणी अटक होईल’, असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केले. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशातच दक्षिण मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीच नाही, असे सांगत या वृत्ताचे स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी खंडण केले.
सह्याद्री अतितीगृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितेले की, मी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला आलोच नाही. माझ्यावर कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, फक्त तेव्हाच मी, एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिंदेंना भेटलेलो नाही. मात्र ज्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हा, त्यांना हात जोडून विचारले की, “साहेब मी काय वाईट केले की, तुम्ही माझ्यावर कलम 354नुसार गुन्हा दाखल केलात.
वैयक्तिक कामासाठी सह्याद्रीवर
आज मी सह्याद्री अतिथीगृहात नगरविकास प्रधान सचिव भूषण गगराणी यांची भेट घेतली. नगरविकास क्षेत्रासंदर्भात माझे काम असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली. परंतु, मी आज मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी इथे आलेलो नाही, असेही आव्हाडांनी यावेळी सांगितले.