पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकांमध्ये आमचे तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह होते, तर त्या चिन्हांशी काहीसे साधर्म्य असलेले पिपाणी हे देखील चिन्ह होते. या दोन चिन्हांतील गोंधळाचा फटका आम्हाला बसला आहे.
परिणामी, राज्यात पिपाणीला चिन्हाला दीड लाख मते गेली असून, साताऱ्याची जागा पडण्यास हे चिन्हच कारणीभूत ठरल्याचा दावा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी केला आहे. साताऱ्याची जागा 45 हजारांनी पडली, यात 37 हजार मते पिपाणीला गेली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
बारामती मतदारसंघात पिपाणी चिन्ह घेऊन उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवारला बीएसपीपेक्षाही अधिक मते मिळाली असल्याची माहितीही पाटील यांनी दिली आहे. आम्ही भाषण करायचो, तुतारी चिन्ह सांगायचो. मात्र, लोकांमध्ये संभ्रम झाला आणि तुतारी समजून अनेकांनी पिपाणीसमोरचे बटन दाबले.
याचा आम्हाला सर्वाधिक फटका बसला. मात्र, ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोपही पाटील यांनी केला आहे.
तर सुळेंचे मताधिक्य वाढले असते
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस असे होते, तर याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे असलेल्या उमेदवाराचे चिन्ह तुतारी (पिपाणी) होते. या मतदारसंघात तीन बॅलेट युनिट होत्या.
या दोन उमेदवारांची चिन्हे वेगवेगळ्या मशिनवर होती. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तुतारी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला 14 हजार 530 इतकी मते मिळाली. संभ्रमामुळे ही मते अपक्ष उमेदवाराला मिळाली. ही मते सुळे यांचीच होती. ही मते सुळे यांना पडली असती, तर त्यांचे मताधिक्य आणखी वाढले असते, असा दावा कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.