पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – हवामानशास्त्र विभागाकडून महापालिकेस सुमारे सहा तास आधी पावसाचा अंदाज देण्यात येतो. यात मंगळवारी शहरात २० मिमीपर्यंत पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात तब्बल १२० मिम च्या आसपास पाऊस झाल्याने पावसाळी आपत्ती व्यवस्थापन कोलमडल्याचे समोर आले आहे.
ढगफुटीसदृश पावसाने मंगळवारी शहराच्या अनेक भागांत तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले. हे पाणी थेट घरांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले. तसेच रस्त्यांवर पाणी साचचून वाहनांचेही नुकसान झाले आहे. मात्र, त्यानंतरही महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी पावले उचलली गेली नाहीत, ही स्थिती धक्कादायक आहे.
महापालिका आयुक्तांनी पावसाळ्यापूर्वी सर्व क्षेत्रीय कार्यालये तसेच संबंधित विभागप्रमुखांना पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक सामग्री तसेच कर्मचारी नेमणुका करण्याचे आदेश दिले होते.
प्रत्येक वेळी पावसाचा अंदाजही क्षेत्रीय कार्यालयांना कळवला जातो. पण, मंगळवारी क्षेत्रीय कार्यालयाचे अनेक कर्मचारी निवडणूक कामात होते. तर, अनेकांनी सकाळपासून गर्दी नसल्याने काढता पाय घेतला. त्यानंतर प्रत्यक्षात तासाभरातचच ढगफुटीसदृश पाऊस झाला. याचवेळी हे कर्मचारी उपस्थित नसल्याने आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजनच कोलमडले.
पथ विभाग, ड्रेनेज विभागाकडून पाहणी
मंगळवारच्या अतिमुसळधार पावसाचे व्हिडिओ व्हायरल झाले. तसेच नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या. त्यानंतर बुधवारी सकाळपासून पथ विभाग आणि ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूरस्थिती उद्भवलेल्या भागात जाऊन पाहणी केली. त्यावर काय उपाययोजना करता येतील, याचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने निर्णय घेतले जाणार आहेत.
पाणी साठलेल्या भागात तातडीने पाहणी केली जात आहे. याबाबत पथ आणि ड्रेनेज विभाग अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार तत्काळ उपाययोजना केल्या जातील. पुन्हा एकदा सर्व विभागांची बैठक घेतली जाणार आहे. – राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका
महापालिका आणि हवामान विभागात दररोज समन्वय ठेवला जातो. त्यानुसार पुढील नियोजन सर्व क्षेत्रीय कार्यालयांना कळविले जाते. मंगळवारी २० ते २२ मिमी पावसाचा अंदाज कळविण्यात आला होता. – गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मनपा