रब्बी हंगामातील पिकांना दिलासा
बेल्हे : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात थंडीची चाहूल लागली असून, रब्बी हंगामात पेरलेले ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना थंडीमुळे दिलासा मिळत आहे. सध्या वाढत असलेल्या थंडी पिकाला पोषक ठरेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. थंडीचा जोर वाढल्याने अनेकांनी कपाटात ठेवलेली उबदार कपडे बाहेर काढले आहेत. दूध विक्रेते, वर्तमानपत्र विक्रेता यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. वाढत्या थंडीने सकाळी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत आहे.
ऊसतोड कामगारांना उपजीविकेसाठी भर थंडीमध्ये ऊस तोडणी करावी लागत आहे. यावर्षी तालुक्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पाण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. बहुतेक ठिकाणी पाणवठे भरलेले असल्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. बेल्हे, राजुरी, निमगाव सावा, मंगरूळ, पारगाव, जाधववाडी, तांबेवाडी, बोरी, बांगरवाडी, गुंजाळवाडी येथे पाण्याचे क्षेत्र जास्त असल्यामुळे या गावांमध्ये थंडीचा जोर अधिक आहे. आणे पठार भागावरील आनंदवाडी, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा येथेही सर्व पाणवठे भरले असल्यामुळे या भागातही थंडी चांगलीच जाणवू लागली आहे.
गरम कपड्यांच्या बाजारपेठा गजबजल्या
थंडीमुळे गरम कपड्यांची दुकाने गजबजली आहेत. या बाजारपेठेत सर्व वयोगटांसाठी विविध प्रकारचे स्वेटर आणि जॅकेट्स उपलब्ध आहेत. जेन्ट्स-लेडीज स्वेटर, मफलर, स्कार्फ, कुर्ता पॅटर्न, टी-शर्ट, जेन्ट्स मास्क, फॅन्सी स्वेटर, हॅन्ड ग्लोव्हज्, महिलांचे स्टोल, शॉल, सॉक्स, कानटोपी, हातमोजे, कानपट्टी यांना मागणी वाढली आहे. लहान बालकांसाठी 30 रुपयांपासून जवळपास 10 हजारांच्या जॅकेटपर्यंत वस्तू बाजारात आहेत. शिवाय 150, 200, 250, 500 रुपयांपर्यंत चांगल्या प्रतीचे गरम कपडेही उपलब्ध आहेत.
गरम कपड्यांच्या किमती
* स्वेटर : 100 पासून 5 हजार रुपयापर्यंत
* जॅकेट : 400 रुपयांपासून पुढे
* हॅन्ड ग्लोव्ह्ज : 80 ते 500 रुपयांपर्यंत
* स्टोल्स : 50 ते 1000 रुपयांपर्यंत
* कानटोपी : 30 ते 500 रुपयांपर्यंत