कराड -कराड पालिकेच्या विशेष सभेत सूचना व उपसूचना मांडण्यावरून चांगलाच गदारोळ झाला. आम्ही नगराध्यक्षांच्या सूचनेनंतर मांडलेली सूचना ऐकून न घेता, त्यावर सखोल चर्चा न करता ती तात्काळ फेटाळून लावण्याचा प्रकार जनशक्ती विकास आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव व त्यांच्या नगरसेवकांनी केला. तसेच दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन उपसूचना एकमताने मंजूर केल्याची माहिती दिली. त्यांनी पूर्णपणे न वाचलेली अपूर्ण उपसूचना मंजूर कशी? असा उलट सवाल करत सूचना मांडण्याचा अधिकार सभागृहातील सर्व सदस्यांना असल्याची माहिती भाजप प्रणित आघाडीचे गटनेते विनायक पावसकर यांनी दिली.
पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. पावसकर म्हणाले, सभा 60 दिवसात का घेतली नाही? सूचना मांडण्याचा अधिकार बहुमतातील गटाला, सदस्यांच्या अधिकारावर गदा, सूचना लपली आदी विषयांसह आम्ही मांडलेली सूचना फेटाळून उपसूचना एकमताने मंजूर झाल्याची माहिती राजेंद्र यादव, सौरभ पाटील व त्यांच्या नगरसेवकांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
वास्तविक पाहता करोनामुळे गेल्या दोन महिन्यात सभा घेण्यास जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळाली नाही. विशेष सभेला परवानगी घ्यावी लागली. सूचना लपवण्याचा प्रश्नच येत नाही कारण सूचनेच्या प्रति यादव, वाटेगावकर तसेच त्यांच्या नगरसेवकांच्या हातात होत्या. आणि सूचना मांडण्याचा अधिकार सभागृहातील प्रत्येक सदस्याला आहे. नगराध्यक्ष उपस्थित सदस्यांपैकी कोणासही सूचना मांडण्यास सांगू शकतात, यासाठी बहुमताची गरज नाही.