गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या चौकशीचा निर्णय तात्काळ द्या! कॉंग्रेसची लोकायुक्तांकडे मागणी

मुंबई – महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना कॉंग्रेसने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावरील चौकशीचा मुद्दा उकरून काढला आहे. मेहता यांनी ताडदेव येथील एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रकरणी विकासकाला लाभदायी ठरेल, असा निर्णय घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची लोकायुक्तामार्फत चौकशी सुरु आहे. या चौकशीचा निकाल अद्यापही न आल्याने तो तात्काळ द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत लोकायुक्तांना पत्राद्वारे केली आहे.

एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रकरणी विकासकाला लाभदायी ठरणारा निर्णय घेतल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी ऑगस्ट 2017 मध्ये लोकायुक्तांकडे चौकशी सोपविली होती. कॉंग्रेसने हे प्रकरण उघडकीस आणले होते. ऑक्‍टोबर 2018 मध्ये या प्रकरणाची लोकायुक्त कार्यालयात शेवटची सुनावणी झाली होती असे समजते.

या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता लोकायुक्त कार्यालयात संपर्क केला असता हे प्रकरण अतिशय गोपनीय असून या संदर्भातील माहिती केवळ लोकायुक्तांच्याच कक्षात उपलब्ध आहे, असे सांगितले गेले. मेहतांवरील आरोपांची चौकशी होऊन दोन वर्षे झाली. तसेच सुनावणी होऊन सहा महिने झाले तरी अद्याप निर्णय आलेला नाही. महाराष्ट्र तसेच देशातील जनतेचे या प्रकरणाकडे लक्ष लागून असल्याने आपण लवकरात लवकर निकाल द्यावा आणि या प्रकरणातील गोपनीयतेवरून पडदा उठवावा ही अपेक्षा आहे, असे सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.