भोपाळ – मध्यप्रदेश कॉंग्रेसच्या चौकीदार चोर है या प्रचार मोहिमेवर गुरूवारी निवडणूक आयोगाने बंदी घातली. भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर ते पाऊल उचलण्यात आले.
राफेल विमान करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून चौकीदार चोर है या वाक्याचा वापर केला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर, मध्यप्रदेश कॉंग्रेसने त्या वाक्याचा आधार घेऊन ऑडिओ आणि व्हिडीओ प्रचार मोहीम हाती घेतली.
मात्र, त्या मोहिमेत आक्षेपार्ह भाषेचा वापर असल्याचा आक्षेप घेत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन आयोगाने त्या मोहिमेवर बंदी घातली. दरम्यान, बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी कॉंग्रेस निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावणार आहे.
आधी परवानगी दिलेल्या मोहिमेवर बंदी घालण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. कुठल्या व्यक्तीचा उल्लेख नसल्याने आमच्या मोहिमेत आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्यावर बंदी घालताना निवडणूक आयोगाने कुठलेच कारण दिलेले नाही, अशी भूमिका मध्यप्रदेश कॉंग्रेसकडून मांडण्यात आली.