इम्रानने चकवले (अग्रलेख)

पाकिस्तानचे ताज्या दमाचे पंतप्रधान इम्रान खान उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात शिरकाव केला. ते कोणी मोठे ज्ञानी अथवा विचारवंत नाहीत. मात्र, भारतात कोणाचे सरकार आले तर बरे होईल याबाबत त्यांनी भाष्य केले आहे. त्यात त्यांनी भाजपला कौल दिला असून त्यावरून आपल्याकडे महाभारतसदृश स्थिती निर्माण झाली आहे. विरोधकांनी न बोलता बरेच साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. तर इम्रान खान यांचे वक्‍तव्य ही विरोधकांची खेळी असल्याचे सत्ताधाऱ्यांना वाटते आहे. त्यांची अवघडलेली स्थिती झाली आहे, एवढे मात्र खरे. इम्रान यांनी बराच काळ झटके खाल्ले आहेत. त्यांच्या देशाच्या राजकारणात ते इतका काळ चाचपडतच होते. बेनझीर भुट्टो यांच्या निधनानंतर भुट्टो घराण्यातून कोणताही समर्थ वारस पुढे आला नाही.

नवाज शरीफ यांचे वय आणि भ्रष्टाचाराचे आरोप पाहता त्यांचाही राजकीय अवतार संपल्यात जमा आहे. इतर पक्ष बरेच असले तरी लक्षवेधी असे कोणी नाही. लष्करी शासक परवेज मुशर्रफ परागंदा झाले आहेत. तेही भ्रष्टाचाराचे आरोप, देशद्रोहाचे आरोप आणि प्रकृतीच्या कुरबुरींनी बेजार. मध्यंतरी त्यांनी दुसरी इनिंग सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काही जमले नाही. सगळीकडून आपल्याला स्थिती अनुकूल असल्याचे लक्षात आल्यानंतर पाकच्या लष्कराने इम्रानरूपी प्यादे पुढे केले. किमान तशा चर्चा तरी होत असतात. इतकेच कशाला इम्रान यांच्या दुसऱ्या का तिसऱ्या पत्नीने पुस्तक लिहून त्यांना उघडे पाडले आहे. लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना विचारल्याशिवाय इम्रान काहीच करत नाहीत, करू शकतही नाहीत, असे त्यांनी त्या पुस्तकात म्हटले आहे. इतरही बरेच धक्‍कादायक खुलासे आहेत. त्यातील काही व्यक्‍तिगत स्वरूपाचे असल्यामुळे फार तपशिलात नको.

मात्र भारत-पाक संबंध प्रकरणच असे आहे की येथे लहानात लहान गोष्टीकडेही दुर्लक्ष करून चालत नाही. त्यामुळे परवा इम्रान खान यांनी कॅज्युअली जे वक्‍तव्य केले ते लक्षवेधी ठरले. पण हे कॅज्युअली होते की त्यामागे काही खेळी होती, हाच कळीचा मुद्दा ठरला आहे. भारतीय निवडणुकांत पुन्हा भारतीय जनता पार्टीला विजय मिळाला तर बरे राहील. भारताशी चर्चा करण्यास आणि काश्‍मीरप्रश्‍न सोडविण्यास त्यामुळे मदतच होईल. या पक्षाव्यतिरिक्‍त जर अन्य कोणते सरकार आले तर काश्‍मीरप्रश्‍नी चर्चा करताना अन्य राजकीय पक्षांच्या टीकेला घाबरून ते तेवढी सक्रियता दाखवणार नाहीत, अशा आशयाची टिप्पणी त्यांनी केली. इम्रान यांच्या नावामागे कितीही मोठे वलय असले तरी विद्वान व्यक्‍ती म्हणून अद्याप तरी त्यांची ख्याती झालेली नाही. बरे झालीही असती, मात्र पत्नीनेच त्यांचा अगोदरच त्रिफळा उडवून ठेवला आहे. पण या वक्‍तव्यामुळे किंवा त्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या वक्‍तव्यामुळे भारतात मात्र गोंधळ उडालाच.

सत्ताधारी भाजपला त्यांनी कौल दिल्यामुळे भाजपची अडचण झाली तर, विरोधी पक्षांनीही बघा, पाकिस्तानलाही तेच हवे आहे, असे शब्दांत न मांडता निर्देशीत करण्याचा प्रयत्न केला आहे. पाचच वर्षांपूर्वी भारतात नरेंद्र मोदी लाट होती. मोदी देतील तेथे व देतील तो उमेदवार निवडून येत होता. मात्र, हा जोर गेल्या वर्ष-दीड वर्षात ओसरला असल्याचे भासते आहे. त्याची सुरुवात गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळीच झाली होती. त्यावेळी विकासाच्या मुद्द्यावर भर देऊनही अपेक्षित परिणाम साधला जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानचा मुद्दा मोदींच्या पोतडीतून बाहेर पडला होता. तशी संधीच कॉंग्रेसच्या एका वाचाळ नेत्याने त्यांना दिली होती.

निवडणुकांच्या राजकारणात त्याचा मोदींनी योग्य वापर करून घेतला. मनमोहन सिंग सरकारभोवतीच संशयाचे भूत उभे करत अखेरच्या टप्प्यात त्यांनी गुजरातमधील भाजपची सत्ता राखण्यात यश मिळवले. दोन्ही देशांतल्या पारंपरिक वैमनस्याचा असा हा फायदा होत असतो. तो जसा आपल्याकडे होतो, तसाच पाकिस्तानातील राज्यकर्त्यांनाही होतो. फरक एवढाच की तेथे राज्यकर्ते केवलवाण्या स्थितीत असतात. आज कोणाचा जोर असलाच तर तो उद्या कायम राहील याची शाश्‍वती नसते. भारताच्या बाबतीत कोणी लक्ष्मणरेखा ओलांडून भारताच्या प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलाच तर तो राजकीय नेता संपतो.

नवाज शरीफ यांचे उदाहरण आताच समोर आहे. कारगीलच्या वेळीही त्यांना डावलून त्यांचे पंख छाटण्यात आले होते. त्याला कारण पाकच्या लष्कराला भारतगंडाने एवढे पछाडले आहे की चर्चेच्या वाऱ्यानेही त्यांना हुडहुडी भरते. इम्रान खान यांच्या एका वाक्‍याचा विचार करताना बरेच पैलू त्यामुळेच ध्यानात घ्यावे लागतात. भाजपच्या एका बड्या नेत्याने ही कॉंग्रेसची खेळी असू शकते. भारतातल्या कोणत्याही महत्त्वाच्या निवडणुकीच्या वेळी अशी विधाने कशी येतात याकडे लक्ष वेधले आहे. यातून भाजपचेच अवघडलेपण दृग्गोच्चर होत आहे. त्याला कारण भाजप हा प्रखर राष्ट्रवाद्यांचा पक्ष आहे. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक वगैरे मुद्दे गाजत असताना आणि तुमचे पहिले मत पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या दहशतवाद्यांना समर्पित असेल अशी वातावरण निर्मिती त्या पक्षाकडून केली जात असताना आणि पाकला धडा शिकवण्याची धमक आमच्यातच आहे, असे सांगितले जात असताना ज्याच्याशी लढण्यासाठी सगळी तयारी करावी, त्यानेच तुमच्या गळ्यात स्वागताची माळ घातल्यावर जशी अडचण होते तशी स्थिती भाजपची झाली आहे.

इम्रान म्हणतात त्याप्रमाणे जर भारतात अन्य कोणत्या पक्षाची सत्ता आली तरी उजव्या विचारसरणीच्या पक्षांच्या प्रखर दबावापुढे नवे सरकार पाकिस्तान विषयाला हात घालायला धजावणारच नाही. ही वस्तुस्थिती आहे. मात्र जर पुन्हा भाजप आला तर त्यांना ते भय असणार नाही, कारण त्यांनी त्यांची प्रतिमाच तशी निर्माण केली आहे. यातला आणखी एक अँगल पाक लष्कराचा आहेच. त्यांना भारताशी दोस्ती नकोच आहे. ती झाली तर त्यांचे कामच काय राहते? त्यामुळे भारतात रोज कोणत्यातरी मंचावरून पाकचा उद्धार करणारे सरकार त्यांना हवेच आहे. चर्चा करणाऱ्या मित्रापेक्षा उद्धार करणारा शत्रू हीच त्यांची गरज आहे.

देशातील सध्याच्या सरकारच्या काळात भारताचे पाकबाबतचे धोरण धरसोडीचेच राहिले आहे. किंबहुना विरोधक आरोप करतात त्याप्रमाणे प्रत्येक बाबतीत या सरकारने कृती अगोदर व विचार नंतर असाच शिरस्ता ठेवला आहे. अन्य शेजारी देशांशीही थोड्याफार फरकाने यापेक्षा वेगळी स्थिती नाही. अशावेळी शत्रूराष्ट्रच असणाऱ्या देशाच्या प्रमुखाच्या एका विधानावरून आपण आपल्या देशातील अन्य पक्षांना त्यांच्यासोबत खेळी करणारे म्हणून न संबोधलेलेच बरे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.