बारामती-मोरगाव जुन्या रस्त्यावर अवघ्या महिन्यापूर्वी सुरू झालेल्या हॉटेल ग्रॅंडनं ग्राहकांच्या जिभेवर रेंगाळायला सुरुवात केली आहे. सत्यव्रत काळे यांच्यातल्या खवय्याची अपार मेहनत त्यामागे किती आहे, हे इथली चव चाखल्यावर लगेचच तुमच्या लक्षात येईल. दैनिक प्रभातच्या वर्धापनदिनानिमित्त सत्यव्रत काळे यांच्याशी साधलेला हा संवाद!
एखादा चांगला आणि नवा फूड जॉइन्ट दिसला, की त्यावर तुटून पडणारे खवय्ये विशेषच म्हणावे लागतील. ठिकठिकाणच्या चवदार चवी चाखून आल्यानंतर या सगळ्याच चवी एकाच छताखाली मिळाल्या तर? असा विचार सत्यव्रत काळे यांच्या मनात आला आणि हॉटेल ग्रॅंडचा जन्म झाला. खरंतर त्यांचा आणि हॉटेल व्यवसायाशी दूरदूरून संबंध नव्हता. पण खाण्याची आणि खिलवण्याची प्रचंड आवड. बारामती नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव, नगरसेवक जयसिंग देशमुख, राष्ट्रवादी शहरचे उपाध्यक्ष सिद्धनाथ भोकरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, माजी नगरसेवक नीलेश इंगुले, नीलेश पलंगे ही त्यांची खास मित्रमंडळी जमली की ठिकाण ठरवून खाण्यासाठी कुठंही धाव घेणारे. पश्चिम महाराष्ट्रातली अनेक हॉटेल्सच्या चवी या सगळ्यांनी चाखल्या आहेत. ही खवय्येगिरी सुरू असतानाच आपणही असं हॉटेल सुरू करावं, असं वाटलं. सगळ्या मित्रमंडळींनी ही गोष्ट उचलून धरली आणि सुरू झाला, हॉटेल ग्रॅंडचा प्रवास! त्याआधी काळे यांनी 2016 मध्ये हैद्राबादी दम बिर्याणीसाठी स्पेशल असं हॉटेल गर्जना बारामतीत सुरू केलं.
बारामतीत फॅमिलीसह हॉटेलमध्ये जाता येईल, अशी ठिकाणं खूप कमी. हीच उणीव हॉटेल ग्रॅंडच्या रूपानं काळे यांनी भरून काढायचं ठरवलं. खायला येणाऱ्या कोणाही खवय्याचा दुजाभाव न होता गरीब आणि श्रीमंत अशा कोणत्याही वर्गातल्या माणसाला सहजपणे हॉटेलिंग करता येईल, असं त्यांचं स्वप्न होतं. म्हणूनच त्यांनी फॅमिली कॉटेज ही संकल्पना बारामतीत राबवली. हॉटेलमध्ये येणार्या प्रत्येक ग्रुपला स्वतंत्र ए.सी. आणि टीव्ही असलेली स्वतंत्र रूम उपलब्ध करून शाही भोजनाचा अनुभव घेता येईल, अशी आगळी वेगळी रचना केली. ही रचनाच हॉटेल ग्रॅण्डचं वैशिष्ट्य ठरलं.
हॉटेल ग्रॅंडमध्ये कोणताही पदार्थ मागवा, तो शाही पद्धतीनं सजवूनच तुम्हाला दिला जाणार.
व्हेज-नॉनव्हेज पद्धतीच्या खवय्यांसाठी हे हॉटेल परिपूर्ण मेजवानीच आहे. पदार्थांची क्वांटिटीही थोडी जास्त आहे. इथं मिळणारे पदार्थही विशेष आहेत. कोकणासारखी चवदार मच्छी, रहू, कटला, भांगडा ही इथली खासियत. इथलं मटन ताट खाल्ल्यास तृप्त होऊनही केवळ पोट भरल्यानं अतृप्त राहाल. इथला पिठलं भाकरीचा पाहुणचार तर एकदा घ्यायलाच हवा. सत्यवान यांच्या आईचा स्पर्श असलेली शेवग्याची भाजी खाल्ल्यास कधीही शेवगा खाताना हॉटेल ग्रॅंडची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. इथल्या प्रत्येक पदार्थाबद्दल थोडंबहुत असंच सांगता येईल. त्याचं कारण सत्यवान काळे यांच्या खवय्यांना तृप्त करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीत आहे.
राजकारणातही सक्रिय!
सत्यव्रत काळे हे मूळचे बारामतीचेच. त्यांचे वडील अर्जुनराव बाजीराव काळे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. सत्यव्रत यांनाही सरकारी नोकरीची ओढ होती पण आदरणीय शरद पवार व व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणानं भारावून ते राजकारण आणि समाजकारणात रमले. त्यांचे चुलते रामभाऊ काळे 30 वर्षं नगरसेवक होते. तसंच भीमराव काळे हेही उपनगराध्यक्ष होते. हाच समाजकारणाचा वारसा आता ते पुढं चालवत आहेत. बारामतीचे नगरसेवक म्हणून जनतेनं मोठा विश्वास त्यांच्यावर टाकला आहे. हा विश्वास सार्थ करण्यासाठी ते तत्पर असतात.
मटन तुमचं, चव आमची!
मटन उत्तम दर्जाचं मटन हॉटेल ग्रॅंडमध्ये वापरलं जातं. पण तरीही अनेक ग्राहक साशंक असतात. त्यामुळंच त्यांचा विश्वासाला पात्र व्हावं म्हणून त्याचं मटण आमच्या मसाल्यात चवदार पद्धतीनं शिजवून ते सर्व्ह करण्याची अनोखी सेवा आम्ही सुरू केली आहे.
– सत्यव्रत काळे
संकलन: प्रमोद ठोंबरे
बारामती