आदर्श गाव निर्माण करण्याचा सरपंच ‘बबनराव ढोबळे’ यांचा ध्यास

वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन भजनात, कीर्तनात रमणारा. राजकारण करताना समाजाची सेवा करून आपले कर्तव्य पार पाडणे हाच ध्यास. गोरगरिबांची कामे करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे आणि गावातील विकासाची कामे करून गावाचा चेहरामोहरा बदलून एक आदर्श गाव निर्माण करण्याचा ध्यास. करोना काळात जनतेची रात्रंदिवस सेवा करून करोना योद्धा म्हणून पारगाव (ता. आंबेगाव) येथील सरपंच बबनराव ढोबळे यांनी केलेले काम प्रेरणादायी ठरत आहे.

करोना काळातील कामे
करोना काळात गावातील जनतेची रात्रंदिवस सेवा केली. गोरगरिबांना व निराधार महिलांना मोफत किराणा माल, धान्य, भाजीपाला वाटप करण्यात आले. आरोग्य तपासणी, आरोग्य सुविधा देण्यात आल्या. गावात औषधांची फवारणी तसेच गाव स्वच्छ ठेवण्याचे काम करण्यात आले. अपंगांना सायकल वाटप करण्यात आले. अपंगांना व्यावसायिक गाळे बांधण्यात आले.

…अन्‌ विकासकामांचा धडाका
गावातील लोकांच्या सहकार्याने आणि राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासकामांचा धडाका लावला. वाड्यावस्त्यांवरील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात आली. तसेच वाचनालय इमारत, स्मशानभूमी शेंड, अंगणवाड्यांच्या इमारती तसेच गावठाण रस्ता, बाजार तळ बांधकाम करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच 14 व्या वित्त आयोगातून मागासवर्गीय लोकांसाठी कामे हाती घेण्यात येणार असल्याचे सरपंच ढोबळे यांनी सांगितले.

पारगाव येथे एका गरीब व वारकरी संप्रदायाच्या घरात बबनराव नामदेव ढोबळे यांचा जन्म झाला. शेतीत काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करीत असत. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने इयत्ता 10 वी मधून शाळा सोडावी लागली आणि वडिलांना शेतीच्या कामात हातभार लावावा लागला. शेती व्यवसाय करीत असताना त्यांना लहानपणापासून समाजसेवेची आवड निर्माण झाली. गावातील सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग व कुटुंबातील आजारी व्यक्‍तीला दवाखान्यात घेऊन जाणे. बैलगाडा मालक असल्याने त्यांचा गावोगावच्या बैलगाडा मालकाशी संपर्क आल्याने त्यांचे समाजकारण फुलत गेले.
अगदी तरुण वयात 1993 मध्ये ते ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवडून आले.

त्यानंतर ते सतत ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवडून येत राहिले. 2003 ते 2006 आणि 2008 ते 2010मध्ये त्यांनी गावचे उपसरपंचपद भूषविले. त्यावेळी तुकाईदेवीच्या मंदिराचे काम, शाळेच्या इमारती, पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्‍या आदी कामे केली. 2018मध्ये थेट जनतेतून सरपंचपदाच्या निवडणुकीत थेट जनतेतून निवडलेला पहिला सरपंच म्हणून मान मिळविला. सामाजिक व राजकीय कामे करत असताना आळंदी पंढरपूर वारी ते दरवर्षी करतात भजन व कीर्तनात रंगणारे सरपंच म्हणून बबनराव ढोबळे हे ओळखले जातात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.