यशोगाथा माणदेशी महिलांची : गोट डॉक्‍टर संगीता तुपे यांनी साधले ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन

श्रीकांत कात्रे

गोट डॉक्‍टर… असा शब्द ऐकून प्रथम आपल्या काहीच लक्षात येत नाही. परंतु, नववीपर्यंत शिकलेल्या संगीता तुपे यांच्या तोंडातून हे शब्द बाहेर येतात आणि या गोट डॉक्‍टरमुळे अनेकांच्या जीवनात बदल होतो, हे ऐकल्यावर आपल्याच तोंडात बोट गेल्याशिवाय राहत नाही. माणसह इतर दुष्काळी भागांत शेळीपालन आणि कुकुटपालन या शेतकऱ्यांना पूरक व्यवसायांना खूप महत्त्व आहे.

पाणी नसल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी नसल्यामुळे रखरखत्या उन्हात हे दोन व्यवसाय शेतकऱ्यांचा मोठा आधार बनतात. माणदेशी फाउंडेशन व बॅंकेने हे लक्षात घेऊन महिलांसाठी शेळी सखी’ हा उपक्रम सुरू केला. त्यांना प्रशिक्षण दिले. आजमितीला विविध भागांत 34 महिला शेळी सखी’ म्हणून काम करीत स्वतः स्वावलंबी झाल्या आहेत आणि शेळीपालन व कुकुटपालन करणाऱ्या शेतकरी महिलांनाही आर्थिक प्रगतीसाठी पूरक कामगिरी करीत आहेत. संगीता विठ्ठल तुपे (रा. इंजबाव ता. माण) याही 2015 पासून शेळी सखी म्हणून काम करतात. लोकांच्या शेतात मजुरी करून किंवा मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या संगीता तुपे आता त्यावेळच्या तुलनेत सुमारे चौपट उत्पन्न कमावत आहेत.

शेळ्यांचे लसीकरण करणे, शेळ्यांचे सीमेन्स भरणे (ब्रीड तयार करणे), शेळ्या, कोंबड्या आजारी असतील तर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करणे, शेळ्यांची खरेदी-विक्रीसाठी मदत करणे या स्वरूपाचे काम शेळी सखी करीत असतात. त्यासाठी त्यांच्या परिसरातील दहा- बारा गावांमध्ये जाऊन घरोघरी फिरून हे काम त्यांना करावे लागते. शेळीपालन किंवा कुकुटपालन करणाऱ्या महिलांशी या शेळी सख्यांचा संपर्क असतो. ज्यावेळी शेतकरी महिलांना कामाची गरज भासते किंवा शेळ्या, कोंबड्यांबाबत काही समस्या निर्माण होते त्यावेळी त्या शेळी सख्यांशी संपर्क करून योग्य उपचारांविषयी मार्गदर्शन घेतात. संगीता तुपे यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले. लग्नानंतर इंजबावसारख्या छोट्या गावात त्या आल्या.

पती रोजगारासाठी मुंबईत. आर्थिक ओढाताण असल्याने लोकांच्या शेतात मजुरीसाठी जायचे किंवा भेटेल ते काम करायचे, असा दिनक्रम सुरू होता असे त्या सांगतात. एके दिवशी माणदेशी फाउंडेशनची विविध प्रकारचे प्रशिक्षण देणारी मोबाइल बस गावात आली. या बसमधून महिलांना शिलाईपासून विविध प्रकारच्या कामाचे प्रशिक्षण दिले जायचे. मग संगीताताईंनी सकाळी आठ वाजता रोजगार हमी योजनेच्या कामावर जायचे आणि दुपारी एकनंतर या बसमध्ये शिलाईकामाचे प्रशिक्षण घेणे सुरू केले. त्या ब्लाउज शिवायला शिकल्या. नंतर हळूहळूू पायजमा व ड्रेस शिकल्या. 

हे काम सुरू असतानाच माणदेशीच्या शेळी सखी प्रकल्पाबाबतची माहिती त्यांना मिळाली. या कामासाठी त्यांनी अर्ज केला. त्यांची निवड झाली. एक जुलै 2015 पासून प्रशिक्षण सुरू झाले. नंतर रोज गावोगावी फिरून हा व्यवसाय करणाऱ्या शेतकरी व महिलांना मार्गदर्शन सुरू झाले. रोज फिरतीचे काम. त्याशिवाय फोन आला की जायचे. रोज शंभर ते दोनशे शेळ्यांची तपासणी करायची. शेळ्या कोंबड्यांच्या आजारापासून वेगवेगळ्या समस्यांसंदर्भात शेतकऱ्यांशी बोलायचे. सीमेन्स भरणे, लसीकरण करणे याबरोबरच शेळ्यांच्या खरेदीविक्रीबाबत सल्ला देणे या कामात दिवस संपू लागला. 

रोजगारासाठी जाणे, नंतर शिलाईकाम करणे, त्याच काळात गावात लेडिज शॉपी सुरू करणे आणि आता शेळी सखी म्हणून काम करणे असा हा संगीताताईंचा प्रवास मोठ्या कष्टाचा आहे. माणदेशी’च्या या शेळी सखी प्रकल्पास फलटणच्या निमकर ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे (नारी) मोठे सहकार्य लाभले आहे. नारी’ कडून या शेळी सखींना शेळ्यांसदर्भात पूर्ण प्रशिक्षण दिले जाते. शेळ्यांना लागणारे ब्रीड, स्ट्रॉ वगैरे त्यांच्याकडूनच मिळते. माणदेशी’च्या या प्रकल्पाचे सल्लागार म्हणून नारी’चा मोठा पाठिंबा मिळत राहतो, असे त्यांनी नमूद केले.

माणदेशी’ संस्थांचे व्यासपीठ मिळाले म्हणून जगण्याला कलाटणी मिळाली, असे संगीताताई सांगतात. त्यांना तीन मुली आहेत. मुलींचे शिक्षण सुरू आहे. माणदेशीने संधी दिल्याने वेगळे आयुष्य सुरू झाले. दृष्टीकोन मिळाला. आता मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार, असे त्या आत्मविश्वासाने सांगतात. शेळी सखी म्हणून काम करताना माझे जगणे बदलून गेले आणि आर्थिकदृष्ट्‌या मी स्वावलंबी झालेच. परंतु, आपले काम करताना इतरांनाही फायदा करून देता येतो, याचाही आनंद कामातून मिळतो, ही गोष्ट खूपच समाधान देणारी आहे. केवळ माणदेशी’मुळे हा जगण्याचा आनंद मिळू लागला आहे, असे त्या कृतज्ञतापूर्वक सांगत होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.