पुणे – उच्च शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी एक हजार क्षमतेचे दोन स्वतंत्र वसतीगृह सुरु करण्यात येणार आहे. याबाबत उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांकडून प्रस्ताव मागविले आहेत.
पुणे व मुंबई विभागांत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यापीठ, महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असतात. 47 वर्षे झाली तरीही पुणे व मुंबई विभागात या मुला-मुलींसाठी वसतीगृह सुरू केलेले नाही. विद्यार्थी संख्येचा विचार करून नव्याने वसतीगृह उभारण्याची मागणी सुराज्य विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमर एकाड यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत व उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्याकडे केली होती.
याप्रकरणी आवश्यकता तपासून सविस्तर प्रस्ताव अभिप्रायसह संचालनालयास सादर करावा, अशा सूचना उच्च शिक्षण संचालक कार्यालयातील अधीक्षक र. वि. चोपडे यांनी पुणे व मुंबई विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक यांना दिल्या आहेत. त्यानुसार आता प्रस्ताव दाखल झाल्यानंतरच वसतीगृह उभारण्याबाबतच्या विषयाचे चित्र स्पष्ट होणार आहे.