पुणे – आर्थिक मागास वर्गात मराठा समाजाचा आधीच समावेश होणार होता. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाल्याने त्यांना आर्थिक मागास वर्गात अर्थसहाय्य करण्याचे आश्वासन म्हणजे दिशाभूल आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुधवारी केली. “नाबार्ड’च्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली.
यावेळी “नाबार्ड’चे मुख्य महाव्यवस्थापक एल. एल. रावळ उपस्थित होते. दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना वैयक्तिक एक लाख रुपयांचा धनादेश यावेळी दरेकर यांनी दिला.
मराठा समाजासाठी चारशे कोटी रुपयांची स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज आहे.
“सारथी’ला सक्षम करण्याची गरज आहे. मराठा समाजाला चांगले पॅकेज देण्याची गरज असतानाही केवळ मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे. ओबीसींचे आरक्षण आम्हाला नको. फडणवीस सरकारने दिलेले स्वतंत्र आरक्षण आम्हाला हवे. सगळ्यांना समान न्याय मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे. न्यायालयीन लढाईत सरकारकडून निष्काळजीपणा झाल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाली, असा आरोपही दरेकर यांनी केला.
करोना संसर्गात पुणे एक नंबरवर असणे क्लेशदायी आहे. हे सरकार अहंकारी आहे. त्यामुळे उपाययोजना केल्या जात नाहीत. औषधांची कमतरता, व्यवस्थेतील त्रुटी दाखवल्या, तर सरकार त्या स्वीकारण्यापेक्षा रेटून नेण्याचे काम करतेय. नियोजन करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे दरेकर म्हणाले.
…तर कंगनाचीही चौकशी झाली पाहीजे
कंगना रनोत ड्रगिस्ट असल्याचे बोलले जात असेल, तर तिचीही चौकशी झाली पाहिजे. प्रत्येक गोष्टीवरून राजकारण करण्याची आवश्यकता आहे का? जर ड्रग्ज घेत असतील एनसीबीने चौकशीला बोलावले तर कोणाच्या पोटात का आणि कशासाठी दुखायला पाहिजे? कंगना जर ड्रग्ज घेत असेल, ड्रगिस्ट असेल तर तिचा संबंधित व्हिडिओची सत्यता पडताळून तिची चौकशी व्हावी, असेही दरेकर यांनी नमूद केले.