अकलूज – अकलूजच्या घोडेबाजारात (Akaluj ghodebajar) जातीवंत घोड्यांची आवक सुरु झाली आहे. देशाच्या विविध राज्यांतून अनेक व्यापारी जातीवंत अश्व विक्रीसाठी घेऊन येत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार येथील व्यापारी घोडे बाजारात दाखल झाले आहेत. सध्या बाजारात 630 जातीवंत अश्व विक्रीसाठी आले आहेत. सुरवातीपासूनच घोडे बाजारात चांगली उलाढाल होत असून, 42 घोड्यांच्या विक्रीतून सुमारे 50 लाखांची उलाढाल झाली आहे. डिसेंबर अखेर तीच उलाढाल 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल, असा अंदाज कृषी ऊत्पन्न बाजार समिती सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी वर्तविला.(Horse market of Akluj)
2009 साली सुरू झालेल्या अकलूजच्या घोडे बाजाराचे हे 14 वे वर्ष आहे. गेल्या वर्षी करोनामुळे घोडे बाजारात सरासरीपेक्षा कमी अश्व विक्रीसाठी आले होते. पण यावर्षी अल्पावधीतच संपूर्ण देशात नावलौकिक मिळविलेला घोडेबाजार देशभरातील पंजाबी, मारवाड जातीचे जातीवंत घोड्यांनी बहरू लागला आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी घोडे बाजारात घोड्यांची आवक वाढणार आहे.(Akluj news)
यावर्षी सुमारे 1500 अश्व बाजारात येतील आणि सुमारे 5 कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. दिवाळी पाडव्यापासून अकलूजचा घोडेबाजार सुरू होतो. त्यापूर्वी महिनाभर अगोदर आणि नंतर महिनाभर अश्वांची खरेदी-विक्री होत असते असेही मदनसिंह मोहिते-पाटील म्हणाले.
डिसेंबर मध्यापर्यंत चालणाऱ्या अकलूजच्या घोडेबाजारात 1 लाखांपासून 25 लाखांपर्यंत किंमतीच्या घोड्यांची खरेदी विक्री दरवर्षी होत असते. यावर्षी घोडे बाजारात सप्टेंबर महिन्यापासूनच घोड्यांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. सध्या सर्व जातीचे मिळून 630 घोड्यांपैकी 42 घोडे विकले आहेत. या बाजारात जातीवंत घोडे खरेदी-विक्रीसाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू या राज्यातील व्यापारी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. घोडे खरेदीसाठी महाराष्ट्रातील ग्राहक आणि पर्यटनस्थळांचे ग्राहक मोठ्या संख्येने अकलूजमध्ये दाखल होत असतात.