पुणे- दिवाळीतील कातिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी आहे. पाडव्याला नवे संवत्सर सुरू होते. यंदा पाडवा आणि भाऊबीज सोमवारी साजरे होणार आहेत. या दिवशी “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात.
व्यापारी वर्ग दिवाळी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरूवात मानतात. नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी वर्षाचा प्रारंभ करतात. यांसह पाडव्याच्या दिवशी घरोघरी पत्नी पतीला औक्षण करते. बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळाचे राज्य दिले होते. दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपालाचे काम स्वीकारले, असे मानले जाते. काही ठिकाणी बळीची अश्वारुढ प्रतिमा काढून तिची पूजा केली जाते.
“पाडव्याला नवीन विक्रम संवत्सर सुरू होत आहे. त्यामुळे जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या या दिवशी सुरू होतात. या वह्यांची पाडव्याच्या दिवशी हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करावी,’ असे पंडित वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले.
भाऊबीजही आज
भावा बहिणीचा सण असणाऱ्या भाऊबीजेने दीपावलीची सांगता होते. लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या पाठोपाठ असणाऱ्या भाऊबीजेमुळे घरोघरी आनंदाचे वातावरण असते. कार्तिक शुक्ल द्वितीयेला यम द्वितीया अर्थात भाऊबीज देखील यंदा सोमवारी साजरी होणार आहे. या दिवशी बहीण-भावाचे औक्षण करते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी देतो.
खरेदीचा मुहूर्त
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या दिवाळी पाडव्याला अनेक जण नव्या वस्तूंची खरेदी करतात. सोने-चांदी, दागिने, वाहने, वॉशिंग मशिन, फ्रीजसारखे होम अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे आदी वस्तू खरेदीकडे अनेकांचा कल असतो. अनेक जण नवीन कार्यांचा शुभारंभ पाडव्याचा मुहूर्त साधून करतात.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा