हडपसर, दि. 29 (प्रतिनिधी) -पुणे-सोलापूर महामार्गावर अमरबाग समोर सिमेंट बंकर उलटून भीषण अपघात झाला. यामध्ये एक जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रणजीत माणिक जाधव (रा. शेवाळेवाडी) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
सोलापूरकडून पुणे शहराच्या दिशेने सिमेंट बंकर (क्र. एमएच 12 टीव्ही 9396) भरधाव वेगाने येत होता. आकाशवाणी केंद्राजवळील रविदर्शन चौक ओलांडून हा बंकर अमरबाग सोसायटीसमोर आला असता समोरून उलट दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नात चालकाचा बंकरवरील ताबा सुटल्याने महामार्गालगत उभ्या असलेल्या दोन रिक्षांना धडक देत बंकर पुढे गेला. त्यानंतर रस्त्याशेजारील झाडावर जोरदार धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, हे झाडही या धडकेत तुटून एका रिक्षावर पडले. यात चौघेजण गंभीर जखमी झाले. तीन रिक्षांचे पूर्ण नुकसान झाले आहे. बंकर चालक अनिल कुमार सिंग (रा. दिंडोरी व्हिलेज, डोंगरी, बिहार) याला पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी, जीवरक्षक बच्चूसिंग टाक, प्रशांत सुरसे, सुनील बनकर यांच्यासह आसपासच्या नागरिकांनी बचाव कार्य केले. क्रेनच्या साह्याने बंकर बाजूला हटविण्यात आला. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावर सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. रिक्षा पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी घटनास्थळी भेट देत अपघातात मृत्यू झालेले रिक्षाचालक रणजित जाधव यांच्याबाबत माहिती घेतली. मृत जाधव यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला मदत केली जाणार असल्याचे डॉ. आढाव यांनी यावेळी सांगितले. हडपसर पथारी संघटनेचे अध्यक्ष मोहन चिंचकर यांच्यासह परिसरातील काही रिक्षाचालक यावेळी उपस्थित होते.