हॉंगकॉंग – चीनच्या नियोजित राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या विरोधात हॉंगकॉंग शहरामध्ये मोठ्या निदर्शनास हॉंगकॉंग पोलिसांनी शनिवारी बंदी घातली, करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि पूर्वी पसरलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी एकत्रित येण्यावरही बंदी घालण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. माजी ब्रिटिश वसाहत असलेले हॉंगकॉंग चीनकडे हस्तांतरित करण्याच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 जुलै रोजीच्या रॅलीसाठीचे अर्जही फेटाळण्यात आले आहेत, असे “सिव्हिल ह्युमन राईट्स फ्रंट’ने (सीएचआरएफ) म्हटले आहे.
हॉंगकॉंग प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांनुसार 50 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास बंदी घातली गेली आहे. लोकशाही समर्थक “सीएचआरएफ’ गटाने गेल्या वर्षी मोठी निदर्शने केली होती. आंदोलनावर बंदी घालण्याच्या प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचे “सीएचआरएफ’ने सांगितले.
मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्र करण्याचे या गटाचे यापूर्वीचे अनेक अर्ज यापूर्वी फेटाळले गेले आहेत. चीनच्या तियान्मेन चौकात 1989 साली झालेल्या सामूहिक हत्याकांडात बळी गेलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेल्या 30 वर्षांपासून व्हिक्टोरिया पार्कमध्ये शेकडो जण हातात मेणबत्त्या घेऊन येत असतात. याच वर्षी प्रथमच या कॅन्डल मार्चला परवानगी नाकारण्यात आली आहे.
हॉंगकॉंगमध्ये करोनाच्या साथीमुळे अनेक आठवड्यांपासून निर्बंध लागू करण्यात आले होते. काही वेळेस निर्बंध शिथिल करण्यात आले. पण रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी वारंवार हे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.