अकोला – अकोला मध्यवर्ती कारागृहात करोनाचे शिरकाव केला असून रविवारी आणखी 50 कैद्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोनच दिवसांपूर्वी कारागृहातील 18 कैदी करोना पॉझिटिव्ह आढळले होते. यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हाचलाची सुरू झाल्या आहेत.
राज्यात करोनाचा संसर्ग वाढल्याने कारागृह प्रशासनाकडून कैद्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. गेल्या तीन महिनांपासून कारागृहात करोनाला रोखण्यासाठी खबरदारी घेण्यात येत असताना मंगळवारी एका बरॅकमधील 18 कैद्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
त्यानंतर रविवारी विविध बरॅकमधील तब्बल 50 कैदी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. यामुळे कारागृह प्रशासनाला धक्का बसला आहे. आठवडाभरातच एकूण 68 कैद्यांना संसर्ग झाल्याने कारागृहातील अन्य 322 कैद्यांनाही धोका होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यापूर्वीच कैद्यांची संख्या कमी करण्यात आली होती. तसेच खबरदारी म्हणून कैद्यांसाठी स्वतंत्र कोविड-19 सेंटर देखील सुरू करण्यात आले आहे.