भोर -भोर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सोमवारी (दि. 6) करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष अनिल पवार, गटनेते तथा माजी नगराध्यक्ष सचिन हर्णसकर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी स्वतःला होमक्वारंटाइन करुन घेतले असल्याची माहिती सचिन हर्णसकर यांनी दिली.
मुख्याधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या एका अधिकाऱ्याचे व शिपायाचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते, त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून एकाचा अहवाल निगेटिव्ह आला तर एकाचा येणेबाकी आहे. याशिवाय भोर नगर पालिकेतील 26 जणांचे स्वॅब भोरच्या आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवले आहेत. या सर्वांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतल्याने भोर नगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने शहरातील सर्व व्यवहार कोलमडले असल्याचे पाहायला मिळत होते. या व्यतिरिक्त भोर शहरातील 21 नागरिकांचेदेखील स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत.
भोर शहरात सध्या करोनामुळे भीतीचे सावट पसरले असून नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष अनिल पवार व गटनेते सचिन हर्णसकर यांनी भोरवासीयांना केले आहे.