नागपूर – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी बंगला सुरक्षा गार्ड म्हणून तैनात पोलीस अंमलदार संजय नारनवरे यांचे बुधवारी रात्री अपघाती निधन झाले. नारनवरे यांच्या निधनानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबत माहिती देत नारनवरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नारनवरे यांच्या दुचाकीस बुधवारी रात्री एका ट्रकने नांदगाव फाटा परिसरात जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, नारनवरे यांच्या मृत्यूबाबत गृहमंत्र्यानी आपल्या ट्विटर खात्यावरून माहिती दिली. अनिल देशमुख यांनी दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करताना नारनवरे यांचा एक फोटो शेअर केला आहे.
नारनवरे यांच्या फोटोसह गृहमंत्र्यांनी, “माझ्या नागपूरच्या निवासस्थानी बंगला सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असणारे पोलीस अंमलदार संजय नारनवरे यांचे अपघातात दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही संजय नारनवरे यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. संजय यांच्या जाण्याने आम्ही आमच्या घरातील एक सदस्य आज गमावला आहे.” असा भावनिक संदेशही दिला आहे.
माझ्या नागपूरच्या निवासस्थानी बंगला सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असणारे पोलीस अंमलदार संजय नारनवरे यांचे अपघातात दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत. संजय यांच्या जाण्याने आम्ही आमच्या घरातील एक सदस्य आज गमावला आहे. pic.twitter.com/8zmrR0Tjkn
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 17, 2021