पुणे –केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या रविवारी (दि. 19 डिसेंबर) पुणे दौऱ्यावर असून ते पुणे महापालिकेत येणार आहेत. त्यांच्या हस्ते महापालिका भवनाच्या हिरवळीवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.
महापौर मोहोळ यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारक साकारण्यात येत आहे. तर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात येत आहे. हे दोन्ही कार्यक्रम गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते येत्या रविवारी दुपारी 3 वाजता होणार असून या दोन्ही कार्यक्रमांस केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थित असणार आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांनी आपणा सर्वांनाच दिशा दिलेली आहे. दैनंदिन जीवनात काम करत असताना या दोन्ही महापुरुषांच्या वाटेवरून वाटचाल करणे, हे प्रेरणादायी आहे. या दोन्ही महापुरुषांचे पुतळे महापालिकेच्या आवारात असावेत, ही मनोमन इच्छा होती. जी आता पूर्णत्वास जात असताना मनस्वी समाधान आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर