नगर -शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निम्मे शहर हॉटस्पॉट घोषित झाले आहे. या भागात राहणाऱ्या हातावार पोट असलेल्या सर्वसामान्य कामगार व नागरिकांची भूक भागवण्यासाठी 1 आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा प्रशासनाच्या विनंतीवरुन घर घर लंगसेवा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती संयोजक हरजित वधवा यांनी दिली.
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून शहरात कोणी उपाशी राहू नये यासाठी सीख, पंजाबी, जैन, गुजराथी व सिंधी समाज, आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब, दानशूर व्यक्ती आणि पोलीस दलाच्या योगदानाने लॉकडाऊनच्या मागील तीन महिन्यापासून लंगर सेवा सुरु होती. सर्व व्यापार व उद्योगधंदे सुरळीत झाल्याने ही सेवा स्थगित करण्यात आली. मात्र, शहरात करोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने मुख्य बाजारपेठसह निम्मे शहर हॉटस्पॉट झाले आहे.
ही जाणीव ठेऊन 1 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही सेवा सध्या चालू असून, नागरिकांना संध्याकाळचे एक वेळेसचे जेवण दररोज देण्यात येणार आहे.
पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे. लंगरसेवेसाठी वधवा यांच्यासह प्रशांत मुनोत, सुनिल छाजेड, किशोर मुनोत, करन धुप्पड, राजा नारंग, सनी वधवा, आदी सेवादार प्रयत्नशील आहेत.