नवी दिल्ली – भारताचा नवोदित बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली चुणूक सातत्याने सिद्ध केली आहे. त्याने मंगळवारी हायलो ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विजय मिळवत दुसरी फेरी गाठली.
लक्ष्य सेनने पहिल्या फेरीच्या लढतीत यजमान फ्रान्सच्या थॉमस रुक्सेलवर 21-17, 21-14 अशी सरळ दोन गेममध्ये अवघ्या 36 मिनिटांत मात केली. आता या दुसऱ्या फेरीत त्याचा सामना तैपेयीचा झु वेई वॅंग व स्विडनचा फेलिक्स बुरेसटेड यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
लक्ष्य सेनचे जागतिक बॅडमिंटन क्रमवारीतील स्थान 22 असून, त्याने यंदाच्या मोसमात यापूर्वी झालेल्या स्पर्धेत सरस कामगिरी केली होती. त्याने डेन्मार्क ओपन स्पर्धेत पहिल्यांदाच दुसरी फेरी गाठली होती, तर फ्रेंच ओपन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. गेल्या वर्षी त्याला काही स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली होती.
एका स्पर्धेपूर्वी त्याचे वडील करोनाबाधित असल्याचे आढळल्यानंतर त्याला नामांकित स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नव्हते. मात्र, आता तो सरस कामगिरी करत असून, यंदाच्या मोसमात त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.