अबुधाबी – कर्णधार थेंबा बवुमाने केलेल्या जबाबदार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सुपर 12 गटातील टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे बांगलादेशचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार थेंबा बवुमाने नाणेफेक जिंकत बांगलादेशला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनीही सार्थ ठरवला. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने बांगलादेशच्या प्रमुख फलंदाजांना बाद करतच धडाक्यात सुरुवात केली. रबाडाने डावातील चौथ्या षटकात सलामीवीर महंमद नईमला बाद केले व त्यानंतर त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले.
दुसरा अनुभवी सलामीवीर लिटन दासने एक बाजू सांभाळून फलंदाजी केली. मात्र, त्याला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही. अखेर दासचाही संयम सुटला व वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात तो 24 धावांवर बाद झाला. त्यांचा भरात असलेला कर्णधार महंमदुल्लाहनेही साफ निराशा केली. अखेर तळात मेहदी हसनने आपले अष्टपैलुत्व पुन्हा एकदा सिद्ध करताना 25 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावताना 27 धावांची खेळी केली. तरीही बांगलादेशला धावांचे शतक फलकावर लावण्यात अपयश आले. 3 गडी बाद करणाऱ्या रबाडाला सुरेख साथ देताना अनरीच नोर्जेनेही 3 गडी बाद केले. तबरेज शम्सीने 2 बळी घेतले, तर डेवन प्रीटोरियसने 1 गडी बाद केला. बांगलादेशचा डाव 18.2 षटकांत 84 धावांवर संपुष्टात आला.
विजयासाठी 85 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही बांगलादेशप्रमाणेच अत्यंत खराब झाली.
संघाच्या अवघ्या 28 धावा झालेल्या असताना त्यांचे दोन्ही सलामीवीर रिझा हेंड्रीक्स व क्वांटन डीकॉक बाद झाले. त्यानंतरही एडन मार्करमनेही निराशा केली. तस्कीन अहमदने त्यांना चांगलेच अडचणीत आणले होते. रुसी वॅन दर दुसेन याने एक बाजू सांभाळताना कर्णधार बवुमासह संघाला विजयासमीप नेले. दुसेनचाही संयम सुटला व तो स्थिरावलेला असताना 22 धावांवर बाद झाला. त्यानंतर बवुमाने आक्रमक फलंदाजी केली व संघाचा विजय साकार केला. त्याने आपल्या नाबाद 31 धावांच्या खेळीत 28 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी केली. डेव्हिड मिलरने नाबाद 5 धावा करताना बवुमाला साथ दिली. बांगलादेशकडून तस्कीन अहमदने 2 गडी बाद केले. मेहदी हसन व नसुम अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
या पराभवामुळे बांगलादेशचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांनी आतापर्यंत अ गटात चार सामने खेळले असून त्यांना एकाही सामन्यात विजय प्राप्त करता आलेला नाही.
संक्षिप्त धावफलक – बांगलादेश – 18.2 षटकांत सर्वबाद 84 धावा. (मेहदी हसन 27, लिटन दास 24, अनरीच नोर्जे 3-8, कागिसो रबाडा 3-20, तबरेज शम्सी 2-21, डेवन प्रीटोरियस 1-11). दक्षिण आफ्रिका – 13.3 षटकांत 4 बाद 85 धावा. (रुसी वॅन दर दुसेन 22, क्वांटन डीकॉक 16, थेंबा बवुमा नाबाद 31, डेव्हिड मिलर नाबाद 5, तस्कीन अहमद 2-18, मेहदी हसन 1-19, नसुम अहमद 1-22).