पाचगणी – महाबळेश्वरमध्ये मंगळवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले. पर्जन्याचे प्रमाण अधिक असलेल्या महाबळेश्वरमध्ये यंदा जून महिन्यात फक्त 22 इंच पावसाची नोंद झाल्याने चिंता व्यक्त होत होती. तालुक्यात दरवर्षी मुसळधार पावसाने अनेक वेळा घाटरस्त्यांवर दरडी कोसळणे, रस्ते बंद होणे अशा घटना घडतात. महाबळेश्वर आणि प्रतापगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने चतुरबेट येथील कच्चा पूल पाण्यात वाहून गेला आहे. महाबळेश्वरात यंदा जून महिन्यात 22 इंच पावसाची नोंद नोंदवली गेली आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये तब्बल 52 इंच पाऊस झाला होता. महाबळेश्वरलगतच्या भागातही मंगळवारी जोरदार पाऊस झाला. गतवर्षी जुलै महिन्यातील अतिवृष्टीने या भागातील रस्ते, पूल वाहून गेले होते. त्यानंतर प्रशासनाने रस्ते व पुलांची तात्पुरती दुरुस्ती केली होती. यंदा मात्र पहिल्याच पावसात या भागातील पूल आणि रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. आगामी काळात अतिवृष्टी झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे. यंदा पहिल्याच पावसात चतुरबेट पूल पाण्यात वाहून गेल्याने तेथील ग्रामस्थांची दळणवळणाची अडचण झाली आहे. त्यांना पर्यायी मार्ग शोधावे लागत आहेत.