कोयनानगर – मुसळधार पाऊसाचे माहेरघर असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गत चोवीस तासात धुंवाधार पाऊस पडला आहे. मुसळधार पाऊसाचा जोर पाणलोट क्षेत्रात कायमच असल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 70 हजार कुसेस्क झाल्यामुळे गत चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 5 टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना धरणात 80.45 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर कायमच आहे.
गत चोवीस तासात पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 228 मिमी, नवजा येथे 184 मिमी तर महाबळेश्वर येथे 242 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस अक्षरशः झोडपुन काढत आहे. पाणलोट क्षेत्रात बुधवारी दिवसभर पाऊसाचा जोर कायमच आहे. कोयनानगर येथे 53/2932 मिमी, नवजा येथे 26/3656 मिमी तर महाबळेश्वर या ठिकाणी 77 /3785 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठीकाणी पाऊसाचा जोर कायमच आसल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाटयाने वाढ होत आहे.
105.25 टीएमसी क्षमतेचे कोयना धरण पूर्णक्षमतेने भरण्यासाठी 25 टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊसाने धुमाकुळ घातला आहे. गतदोन दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात 10 टीएमसी वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर कायम राहील्यास येत्या 36 तासातच कोयना धरण 100 टीएमसी भरेल. सध्या कोयना धरण पुर्णक्षमतेने भरण्यास प्राधान्य असून त्यानंतर जलपातळी नियंत्रीत करण्याचा विचार केला जाईल, असे कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी स्पष्ट केले.