पुणे, दि. 11 – शहरात रविवारी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. ओढ्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरले. काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. अवघ्या सव्वातासात 55 मिलिमीटर नोंदविल्या गेलेल्या पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली.
जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, सिंहगड रस्ता, फर्गसन रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता आणि इतर महत्त्वाच्या रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. दुचाकी आणि चारचाकी गाड्या बंद पडल्या तर काही ठिकाणी वाहने वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील ड्रेनेज भरून वाहात होते. त्यामुळे सर्व रस्ते जलमय झाले होते.
शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या घरात आणि दुकानांत पाणी साचल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. दत्तवाडी, दांडेकर पूल परिसरातील अंबिल ओढ्याच्या लगतच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवार असल्यामुळे नागरिक सायंकाळी खरेदीसाठी घराबाहेर पडले असता अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. नागरिकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागत होती. सुमारे सव्वातास मुसळधार कोसळल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. शहरातील पेठांमध्ये वारंवार वीज खंडित होत होती.
पावसाची नोंद
शिवाजीनगर 38.4
पाषाण – 55.8
लोहगाव – 66.0
मगरपट्टा – 55.5