नाशिक – नाशिक जिल्ह्यातील एरंडगाव (ता. येवला) येथे दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. लहान भावाला वाचवताना थोरल्या भावाचाही मृत्यू झाल्याने पोळा सणादिवशीच गावावर दुःखाचे सावट आहे.
हर्षल जगताप (वय 14) आणि सार्थक उर्फ शिवा (वय 12) अशी मृतांची नावे आहेत. एरंडगाव येथील संतोष पुंडलिक जगताप यांची मुले पोळा सणाच्या आदल्या दिवशी रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शेतात गेली होती. संतोष हे पोळ्याचा सण घेऊन पत्नीसह पाहुण्यांकडे गेले होते. जगताप यांच्या शेतात एक शेततळे आहे. या मुलांनी शेतात येताच आपला मोर्चा शेततळ्याकडे वळवला.
सार्थक उर्फ शिवा हा कपडे काढून पोहण्यासाठी तळ्यात उतरला. मात्र, त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो गटांगळ्या खावू लागला. हर्षलने हे पाहताच भावाकडे झेप घेतली. मात्र, त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
हर्षल आणि शिवा ही भावंडे साताळी जिल्हा परिषदेत अनुक्रमे सातवी आणि सहावीला होती. पोळा घेऊन गेलेले संतोष सायंकाळी पत्नीसह घरी आले. मात्र, घरात दोन्ही मुले नव्हती. त्यांनी त्यांचा शोध घेतला. शेवटी शेततळ्याच्या काठावर दोघांचे कपडे दिसले. त्यांनी तळ्यात शोध घेतला असता दोन्ही मुले पाण्यात सापडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.