महिलांचे श्रद्धास्थान सईबाई माता मंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत

पुरातनकालीन संस्कृतीचा ठेवा जपावा; माजी सरपंच जयश्री सातव पाटील यांचे ग्रामस्थांना आवाहन

वाघोली ( प्रतिनिधी) – येथील पुरातनकालीन कापूर विहिरीलगत असलेले महिलांचे श्रद्धास्थान सईबाई माता मंदिर दुर्लक्षित (सटवाई) असून जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात आली आहेत. परंतु महिला भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सईबाई माता मंदिराकडे ग्रामपंचायतकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार करून पुरातनकालीन ठेवा जपावा अशी भावना माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील व्यक्त केली आहे.

वाघोली गावाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्व असून भारतीय संस्कृतीत मंदीरांना अगदी पुरातन काळापासून महत्वाचं स्थान आहे. वाघोलीमध्ये वाघेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर, राममंदिर, सईबाई माता मंदिर आदि पुरातनकालीन धार्मिक स्थळे आहेत. दरवर्षी वाघेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर, राम मंदिरामध्ये धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

पंचक्रोशीसह जिल्हा व जिल्ह्याबाहेरील भाविक-भक्त मोठ्याप्रमाणावर दर्शनासाठी येतात. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढकार घेऊन वाघेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर, राममंदिराला नवसंजीवनी दिली. परंतु पुरातनकालीन महिलांचे श्रद्धास्थान असलेले सईबाई माता मंदिर अजूनही दुर्लक्षित आहे. वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने कोटी रुपये खर्च करून विविध विकास कामे केली असली तरी सईबाई माता मंदिराचा जीर्णोद्धाराकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे भाविक महिलावर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सईबाई माता हे राममंदिर-भावडी रस्त्यावर असून मंदिरालगत कापूर विहीर असून रम्य ठिकाण आहे.

सईबाई माता मंदिरासारखीच पुरातनकालीन असणाऱ्या वाघेश्वर मंदिराची स्थिती होती. परंतु माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी पुढकार घेऊन वाघेश्वर विकास प्रतिष्ठान, ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या माध्यमातून मंदिराला नवसंजीवनी देऊन पुरातन ठेवा जपला आहे. त्यामुळे वाघेश्वर मंदिर धार्मिक स्थळाबरोबरच पर्यटनस्थळ बनले असल्यामुळे वाघोलीच्या वैभवात भर पडली आहे. त्याचप्रमाणे महिलांचे श्रद्धास्थान असलेले सईबाई माता मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे येऊन पुरातनकालीन संस्कृतीचा वारसा जपावा असे आवाहन माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी केले आहे.

माजी सरपंच जयश्री सातव पाटील, चंद्रकला शिंदे, मोहिनी तांबे, सुरेखा बाळासाहेब सातव, छाया बहिरट, आशा वाघमारे, भामाताई सातव (रोकडे), अनिता तोषणीवाल, अपर्णा बहिरट, वैशाली बहिरट, बारगुजे आदि महिलांनी सईबाई माता मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

महिलांचे श्रद्धास्थान असलेले सईबाई माता मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी ५१ हजार रुपये देणार आहे. ग्रामस्थांनी मंदिराच्या जीर्णोद्धासाठी हातभार लावून पुरातनकालीन ठेवा जपण्यासाठी पुढे यावे. –

जयश्री सातव पाटील (माजी सरपंच, वाघोली)
फोटो ओळ : वाघोली येथील पुरातनकालीन दुर्लक्षित असलेले सईबाई माता मंदिर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.