जालना – जालना जिल्ह्यामध्ये किमान 103 बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाले आहे. एकूण 166 डॉक्टर विनापरवाना धारक डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचेही तपासणीमध्ये उघड झाले आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात 433 डॉक्टर असून त्यापैकी 267 जणांची नोंदणी झालेली आहे. तर 166 जणांची “महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’कडे नोंदणी झालेली नाही. तर 103 जणांकडे वैध वैद्यकीय प्रमाणपत्रदेखील नाही. या सर्वांना बोगस डॉक्टर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
हे बोगस डॉक्टर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि झोपडपट्ट्यांमध्ये सक्रिय होते. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे स्वतः जालना जिल्ह्यातील असून जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, हे विशेष आहे.
या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यास प्रारंभ करण्यात आला असल्याचे जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते.