पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाच्या बेसमेंटमधील प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आज शनिवार दुपारी सव्वा चारच्या सुमारास आग लागली. चिंचवड भागात सकाळपासून वीज नसल्याने जनरेटरवर रुग्णालयाचा वीजपुरवठा सुरू होता.
सकाळपासून जनरेटर सुरू असल्याने बॅटऱ्या तापल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीमुळे धुराचे लोट रुग्णालय परिसरात पसरले. तर रुग्णालयातील पाच महिला आणि लहान बाळांना त्वरित थेरगाव रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळा पूर्वीची कामे करण्यासाठी चिंचवड परिसरात आज सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात सकाळी 10 वाजतापासून जनरेटरवर वीजपुरवठा सुरू होता. मात्र, दुपारी सव्वा चारच्या सुमारास बॅटऱ्या प्रचंड तापल्याने आग लागली.
आग लागल्याने रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा आपोआप सुरू झाली. त्यामुळे आग काही प्रमाणात आटोक्यात आली होती. तसेच आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या थेरगाव, प्राधिकरण आणि रहाटणी केंद्राचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच आग विझविण्यात जवानांना यश आले.