रेडा- सामाजिक बांधिलकीतून गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा उत्तम मिळण्यासाठी स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठानच्या वतीने लवकरच पुण्याजवळ सर्व सुविधायुक्त हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार असल्याची ग्वाही हभप मच्छिंद्र महाराज लांडगे यांनी दिली. स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठानची स्थापना केल्यावर प्रतिष्ठानचा उद्घाटन सोहळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप मच्छिंद्र महाराज लांडगे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. इंदापुरमध्ये रामचंद्र हाईटस् सुयोग हॉल येथे हा सोहळा पार पडला. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव गणेश इनामके, खजिनदार संजय शिंदे यांनी स्वागत केले.
मच्छिंद्र महाराज लांडगे म्हणाले, हॉस्पिटलमध्ये जनरल ओपीडी, गायनॉलॉजी ओपीडी, मेडिकल, पॅथालॉजी लॅब, एक्स- रे, ईसीजी, ऍम्ब्युलन्स सेवा आदींसह वैद्यकीय सर्व सुविधा उत्तम प्रकारे देण्यात येणार आहेत. हॉस्पिटल बांधण्यासाठी पन्नास जणांची कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी कोअर कमिटीच्या पन्नास सदस्यांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले. महाराज लांडगे यांचे समाजप्रबोधन, किर्तन, प्रवचन व सत्संग या माध्यमातून पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश आदी भागात अविरत कार्य सुरू आहे. सूत्रसंचालन क्रांती पवार यांनी केले. हभप यज्ञेश्वर धुमाळ, गणेश इनामके यांनी स्वागत केले. हभप संजय शिंदे यांनी आभार मानले.