Parliament security breach : संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आता अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहे. या घटनेचा मास्टरमाइंड ललित झा याने पोलिसांना उलट तपासणीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. संसदेत शिरण्याची योजना अयशस्वी झाली असती तर गुन्हेगारांकडे बॅकअप प्लॅन अर्थात प्लॅन बी तयार होता, असे झा याने पोलिसांना सांगितले असल्याचे समजत आहे. यातच आता दिल्ली पोलिसांनी सहाव्या आरोपीला अटक केली आहे.
महेश कुमावत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संसदेत घुसखोरी करण्यासाठी महेश गेल्या दोन वर्षांपासून अन्य आरोपींच्या संपर्कात होता. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी दिल्लीपोलिसांनी यापूर्वीच अन्य पाच आरोपींना अटक केली आहे. सागर शर्मा, मनोरंजन गौडा, अमोल शिंदे, नीलम देवी आणि ललित मोहन झा, अशी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.
सागर शर्मा आणि मनोरंजन गौडाने लोकसभे सभागृहात उडी मारुन गोंधळ घातला होता, यावेळी त्यांनी स्मोक कँडल फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तर, अमोल शिंदे आणि नीलम देवी संसदेबाहेर घोषणाबाजी करत होते. याप्रकरणी ललित झा वगळता बाकीच्यांना त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. ललित झा आणि महेश कुमावत नंतर स्वत: पोलिसांना शरण आले.
मीडिया रिपोर्टनुसार, 13 डिसेंबर रोजी महेश कुमावत दुसऱ्या गेटवर स्मोक कँडल घेऊन उभा राहणार होता, पण तो दिल्लीत येऊ शकला नाही. इतर आरोपींसोबत महेशदेखील या कटात महत्वाचा आरोपी आहे. शनिवारीच महेशला चौकशीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. ही योजना यशस्वी करण्यासाठी महेश गेल्या दोन वर्षांपासून आरोपींच्या संपर्कात होता. पुरावे नष्ट करुन त्याने आरोपींना मदतही केली. या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करण्यासाठी महेशची चौकशी करण्याची गरज असल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे.
या अटकेनंतर महेश कुमावतला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले, कोर्टाने कुमावतला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी 15 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, कोर्टाने सात दिवसांचीच कोठडी सुनावली. महेशचे इन्स्टाग्राम डीकोड करून तपास पथकाने अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे. महेशवर तरुणांना भडकावण्याचा तसेच व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे ब्रेनवॉश केल्याचा आरोप आहे. तो त्याच्या इन्स्टाग्रामवर क्रांतिकारकांची छायाचित्रे पोस्ट करत असे.