शिवजयंती निमित्त आयोजित मिरवणुकीचे, हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार उद्घाटन

कोल्हापूर : राज्यभरात १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येते. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल व गडहिंग्लज तालुक्यात देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. उद्या १९ फेब्रुवारी रोजी गडहिंग्लज तसेच कागल येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.

गडहिंग्लज येथील श्री. शिवाजी मराठा मंडळाने शिवजयंती निमित्त उद्या १९ फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक तसेच चित्ररथ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या मिरवणुकीचे व चित्ररथांचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी ५:३० वाजता मंत्री श्री. मुश्रीफ यांनी उद्घाटन केल्यानंतर या मिरवणुकीचे प्रस्थान गडहिंग्लज येथील शिवाजी चौक येथून होणार आहे.

कागल तालुक्यात देखील कागल नगरपरिषद व ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कागल येथील मिरवणुकीचे उदघाटन मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होणार असून त्यानंतर मिरवणुकीचे प्रस्थान होईल.

कागल येथे शिवजयंतीनिमित्त कागल एसटी स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी  शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २२ व २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कागल येथील छ. शाहू स्टेडियम येथे  ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.