मॉस्को : भारतीय वायुदलाचे चार वैमानिक महत्त्वाकांक्षी मानवयुक्त अंतराळ मोहीम “गगनयान’ यशस्वी करण्यासाठी रशियात खडतर प्रशिक्षण घेत आहेत. रशियाच्या युरी गागारिन रिसर्च अँड टेस्ट कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या भारतीय अंतराळवीरांना या गोपनीय प्रशिक्षणाच्या दरम्यान जीव देखील जोखिमीत टाकावा लागत आहे.
रशियाच्या अंतराळवीरांना हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी सर्वसाधारपणे 5 वर्षांचा कालावधी लागतो. पण भारतीय अंतराळवीरांकरता एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून अंतराळवीरांना केवळ 12 महिन्यांमध्येच अंतराळ प्रवासासाठी सज्ज केले जाणार आहे. रशियाच्या याच प्रशिक्षण केंद्रात भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी धडे गिरविले होते.
पूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम रशियन भाषेत असल्याने भारतीय अंतराळवीरांना रशियन भाषा शिकावी लागत आहे. “सोयूज’ या अंतराळ यानात सर्व दस्तऐवज आणि निर्देश रशियन भाषेत आहेत. तेथील प्रशिक्षक भारतीयांना रशियन भाषा शिकविण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. सर्व प्रशिक्षकांना इंग्रजी भाषा अवगत असली तरीही तेथील नियमानुसार रशियन भाषेतच प्रशिक्षण देण्यात येतेय.
मास्को शहराबाहेरील स्टार सिटीमध्ये अंतराळवीर प्रशिक्षण घेत आहेत. हा प्रशिक्षण कार्यक्रम भारताच्या गरजा ओळखून तयार करण्यात आला आहे. यात अंतराळ आणि शारीरिक प्रशिक्षणासह अत्याधुनिक अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जात असल्याची माहिती प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख पावेल व्लेसोव्ह यांनी दिली. पुढील एक वर्षात भारतीय अंतराळवीर रशियाच्या सोयूज अंतराळयानाच्या सर्व पैलूंचा अभ्यास करतील आणि यातून त्यांना गगनयान हाताळणे सोपे ठरणार आहे.
भारतीय अंतराळवीरांना जीवघेण्या स्थितीत जिवंत राहण्याचे कसब शिकविले जात आहे. अंतराळातून परतताना समस्या उद्भवल्यास काय करावे याचे धडे ते गिरवत आहेत. सद्यकाळात भारतीय अंतराळवीर मास्को येथील जंगल आणि दलदलीच्या भागात असून तेथे अनेक हिंस्त्र श्वापदे त्यांच्या साथीला आहेत.
3 दिवस आणि 2 रात्रींच्या कालावधीत जिवंत राहण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण त्यांना दिले जाईल. या कालावधीत डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर देखरेख ठेवणार आहे. भारतीय अंतराळवीरांना हाडं गोठविणारी थंडी आणि बर्फाने भरलेल्या जंगलात स्वतःचा बचाव करणे अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे.