पुणे – बँकेत कॅश भरण्यासाठी येणार्या नागरिकांना बँकेचा ग्राहक असल्याचे सांगून विश्वास संपादीत केल्यानंतर चलाखीने रोकड लुटणार्या टोळीला लष्कर पोलिसांच्या पथकाने अटक केली. अटक करण्यात आलेले तिघे आरोपी हे मूळचे हरियाणातील आहेत. आरोपींनी संगणमताने राज्यातील विविध शहरासह परराज्यात देखील अशाप्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्याकडून १९ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण उपस्थित होते. दिपककुमार ओमप्रकाश मेहंगी (४७, रा. पानीपत, हरीयाणा), सुनिल रामप्रसाद गर्ग (३७, रा. पानीपत, हरीयाणा), सुरजकुमार ओमप्रकाश मेहंगी (२९, रा. हरीयाणा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. काही दिवसांपुर्वी कॅम्प भागात पैसे काढण्यासाठी आलेल्या एका व्यावसायिकाची अर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. फिर्यादी व्यावसायिक यांनी बँकेतून तीन लाख रुपये काढले होते.
यानंतर तेथेच उभा असलेल्या आरोपी दिपककुमारने आपण बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवून फिर्यादींशी संवाद साधण्यास सुरवात केली. त्यानंतर तुमच्या एका बंडलमध्ये कमी नोटा असल्याचे सांगून त्या बदलून देतो, असे सांगितले. त्याच्यावर फिर्यादीने विश्वास ठेवला. काही वेळातच फिर्यादीची नजर चूकवून आरोपी दिपककुमार तेथून पसार झाला. लष्कर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास करून दिपककुमार याला त्याचा साथीदार सुनिल याच्यासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनूसार सुरजकुमार यालाही ताब्यात घेण्यात आले. तिघांनी संगणमताने राज्यातील विविध शहरासह गुजरात आणि मध्यप्रदेशात देखील अशाप्रकारेच गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
बँकेत कॅश भरण्यासाठी आलेल्या नागरिकांचा बँकेचे ग्राहक असल्याचे भासवून आरोपी पैशांची लूबाडणूक करत होते. त्यांच्याकडून एकूण १९ गुन्ह्याची उकल झाली आहे. पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त आर. एन. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे निरीक्षक प्रियंका शेळके, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, अंमलदार महेश कदम, विलास शिंदे, अतुल मेंगे, मंगेश बोर्हाडे, रमेश चौधर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना बँकेतील कर्मचारी असल्याचे भासवून आरोपी फसवणूक करायचे. राज्यासह परराज्यात देखील अशाप्रकारचे काही गुन्हे केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यादृष्टीने अधिकचा तपास सुरू आहे, असे परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या.