पीएमपीएमएलकडून दीड वर्षात 450 कर्मचाऱ्यांचे निलंबन

पुणे – पीएमपीत काम करताना वरिष्ठांनी मारलेले शेरे, संचलनात असताना अपघातास कारणीभूत, गैरवर्तवणूक यांसारख्या विविध कारणांमुळे मागील दीड वर्षांत पीएमपीतील तब्बल 450 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईत चालक, वाहकांची संख्या सर्वाधिक असून इतर विभागातील कर्मचारी काही प्रमाणात आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपीएमएल) चालक, वाहकांसह प्रशासनातील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 9 हजारांहून अधिक आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या चालक, वाहकांची आहे.

शहरात खिळखिळ्या बस चालविताना चालकांना कसरत करावी लागते. तसेच, बसेस ब्रेकडाऊन होऊन अपघात होण्याच्या घटनाही सातत्याने घडतात. अशा घटनांमध्ये चालकाला जबाबदार धरून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे मागील काही महिन्यांत घडलेल्या घटनांवरून दिसून येते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना अभय
पीएमपी बसेसचे ब्रेकडाऊन रोखणे, संचलनापूर्वी बसची तपासणी व योग्य देखभाल दुरुस्ती करून घेण्याचे काम डेपो इंजिनिअर, मॅनेजर यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. मात्र, सध्या दैनंदिन बसेस ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण सत्तरपेक्षा अधिक आहे. तर, सातत्याने अपघात, ब्रेक निकामी होणे व बसेस पेटण्याच्या घटना घडतात. परंतु, अपघात घडल्यानंतर केवळ चालकाला दोषी ठरवून संबंधित अधिकाऱ्यांना अभय दिले जाण्याचा प्रकार घडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.